जलभुयारी मेट्रोचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
भारतातला पहिला प्रकल्प साकारला कोलकात्यात, वाहतूक व्यवस्था सुधारणार
वृत्तसंस्था / कोलकाता
भारतातील प्रथम जलभुयारी मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हा प्रकल्प पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे साकारला आहे. या प्रकल्पासाठी 15 हजार 400 कोटी रुपयांचा खर्च आला असून ही मेट्रो नदीच्या पाण्याखाली 13 मीटरवरुन प्रवास करणार आहे.
उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोमधून लहान मुलांसमवेत प्रवासाचा आनंदही घेतला. कोलकात्याच्या वाहतूक व्यवस्थेवरचा ताण या मेट्रोमुळे कमी होईल आणि शहराची वाहतूक व्यवस्था सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मेट्रोच्या प्रथम टप्प्याचे काम पूर्ण झाले असून भविष्यात हा प्रकल्प विस्तारला जाणार आहे, अशी माहिती रेल्वेविभागाकडून देण्यात आली आहे.
प्रथम मेट्रो कोलकत्यातच
1984 मध्ये कोलकाता येथेच देशातील प्रथम मेट्रो प्रकल्प साकारण्यात आला होता. त्याचे यश पाहून नंतर दिल्ली आणि इतर महानगरांमध्ये असे प्रकल्प हाती घेण्यात आले होते. आजही अनेक शहरांमध्ये मेट्रो साकारण्याचे काम होत आहे. कोलकात्यातील प्रथम मेट्रोनंतर चाळीस वर्षांनी आज याच कोलकात्यात भारताची प्रथम जलभुयाची मेट्रो धावली आहे. या योगायोचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केला आहे. या मेट्रोमुळे हावडा ते कोलकाता प्रवास वेगवान होणार आहे.
असे आहे मेट्रोचे स्वरुप
या जलभुयारी मेट्रोसाठी हावडा स्थानक ते महाकरण स्थानक यांच्यामध्ये 520 मीटर लांबीचे जलभुयार खोदण्यात आले आहे. या भुयारात दोन रेल्वेमार्ग टाकण्यात आले आहेत. हे अंतर ही मेट्रो 80 किलोमीटर प्रतितास या वेगाने केवळ 45 सेकांदात कापणार आहे. या मेट्रोच्या इतरही शाखा आहेत. सध्या हावडा मैदान ते एस्प्लनेड असा साडेचार किलोमीटर लांबीचे जलमार्ग निर्माण करण्यात आला आहे. या मार्गावर चार भूमीगत मेट्रो स्थानके आहेत.
प्रवास होणार वेगवान
हावडा ते कोलकाता असा प्रवास प्रतिदिन 7 ते 8 लाख लोक करतात. जलभुयारी मेट्रोमुळे सध्याच्या प्रवासमार्गांवरचा ताण पुष्कळ कमी होणार आहे. विद्यार्थी आणि तरुणांचीही मोठी सोय होणार आहे. हा मार्ग नदीखालून जात असल्याने भूमीच्या व्यय या प्रकल्पात झालेला नाही, अशी महिती देण्यात आली.
निर्मितीकार्य होते जटील
या जलभुयारी मेट्रोची निर्मिती करण्याचे कार्य सोपे नव्हते. नदीखालून भुयारी मार्ग निर्माण करण्यात अनेक अडचणी होत्या. सहा महिने केवळ भूमीच्या परीक्षणाचे काम चालले होते. भुयारांमध्ये वरचे पाणी शिरु नये म्हणून विशेष दक्षता घेणे आवश्यक होते. वास्तविक प्रकल्पाचा प्रस्ताव 2016 चा आहे. भुयारे खोदण्याचे काम 2017 मध्ये हाती घेण्यात आले, असेही स्पष्ट करण्यात आले.
निम्म्या वेळेतच काम पूर्ण
भुयारे खोदण्याचे काम 125 दिवसांमध्ये पूर्ण होईल, असे प्रथम अनुमान होते. तथापि, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वेगवान काम करण्याच्या पद्धतीला अनुसरुन हे काम केवळ 67 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले. वाटेत एका मोठ्या खडकाचा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, तो अडथळाही आधुनिक यंत्रसामग्रीचा उपयोग करुन दूर करण्यात आला. त्यामुळे हा प्रकल्प पूर्वनिर्धारित वेळेआधीच साकारला गेला आहे. परिणामी, तो आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे.