हेस्कॉमच्या शहर विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
बेळगाव : नेहरुनगर येथील हेस्कॉमच्या नूतन अर्बन डिव्हिजन कार्यालयाचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले. या कार्यालयामुळे शहर हेस्कॉम विभागाला सुसज्ज असे कार्यालय उपलब्ध झाले आहे. या कार्यालयामुळे नागरिकांना आपली कामे करून घेण्यास सोय होईल. तसेच अत्याधुनिक सेवा कार्यालयात दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, शहरामध्ये सर्व सोयींनीयुक्त हेस्कॉमचे कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांना जलदरित्या सेवा उपलब्ध होणार आहेत. नागरिकांचे कोणतेही काम रखडणार नाही, याची खबरदारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनीही घ्यावी.
चांगली इमारत सरकारने उपलब्ध करून दिली आहे. आता याद्वारे नागरिकांची कामे करण्यावर भर द्या, असा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ होते. व्यासपीठावर वायव्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, गॅरंटी स्कीमचे एच. एम. रेवण्णा, विनय नावलगट्टी, हेस्कॉमचे बेळगाव विभागीय मुख्य अभियंता प्रवीणकुमार चिकार्डे, शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करून हेस्कॉमचा कारभार सुलभ व्हावा, यासाठी हे कार्यालय महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.