दोडामार्गात संविधान मंदिराचे उद्घाटन
दोडामार्ग - वार्ताहर
संविधान हेच सर्वांचे मार्गदर्शक आहे. प्रत्येकाने संविधानाचा मान सन्मान राखला पाहिजे. आपले संविधान हे जगात चांगले संविधान म्हणून ओळखले जाते. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विवेकानंद नाईक यांनी केले. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त औ. प्र. संस्था दोडामार्ग येथे संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य विवेकानंद नाईक यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.भारताला जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाचे केंद्र बनविण्याचे स्वप्न असून युवकांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित आहे. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झालेल्या एल्फिस्टन टेक्नीकल हायस्कूल मुंबई येथे कौशल्य विकास विभागाच्यावतीने राज्यातील प्रत्येक आय.टी.आय. मध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. या संविधान मंदिराचे उद्घाटन १५ सप्टेंबर रोजी भारताचे उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम आभासी पद्धतीने राज्यातील सर्व आय.टी.आय. मध्ये दाखविण्यात आला. यावेळी प्राचार्य पी. बी. ढवळ, गटनिदेशक एस . व्ही. बिबवणेकर, मुख्य लिपिक रियाज शेख, कृषी मंडळ अधिकारी अजितकुमार कोळी, प्रा. रमाकांत जाधव तसेच आय.टी.आय. दोडामार्गचे सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, एस. बी. शहापूरे, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेविका सोनल म्हावळणकर, मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली. दिनांक १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर पर्यंत संस्थेमध्ये चित्रकला, रांगोळी, निबंधस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. सदर उद्घाटनाचा कार्यक्रम हा आय.टी.आय. दोडामार्गच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आयोजनाने यशस्वीरित्या संपन्न झाला.