महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रतिगामीं विरोधात प्रादेशिक शक्तींनी एकत्र येणे गरजेचे; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आवाहन

01:56 PM Feb 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
Comrade Govind Pansare Memorial by Sharad Pawar
Advertisement

देशात पुरोगामी विचार दाबला जात असल्याचा आरोप; कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतीस्मारकाचे लोकार्पण

कोल्हापूर प्रतिनिधी

देशात पुरोगामी विचारावर काम करणारे, पुरोगामी विचार मांडणाऱ्यांना सत्तेचा गैरवापर करत तुरुंगात टाकले जात आहे. सत्तेच्या गैरवापरातून पुरोगामी आवाज बंद करु शकतो हे प्रतिगामी शक्तींनी दाखवून दिले आहे. देशाची घटना, समता, सामाजिक मूल्य अबाधित ठेवायची असल्यास प्रतिगामी शक्ती विरोधात आता लढावे लागणार आहे. पुढीला काळात निवडणुका लागणार आहेत. संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. प्रतिगामी शक्तीला रोखण्यासाठी देशातील प्रादेशिक शक्तींनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

Advertisement

रेड्याची टक्कर परिसरातील वि. स. खांडेकर विद्यामंदिर प्रांगणात महापालिका व आमदार सतेज पाटील यांच्या निधीतून कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे स्मृतीस्मारक उभारण्यात आले आहे. या स्मृतीस्मारकाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते.

Advertisement

ज्येष्ठ नेते पवार म्हणाले, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी समाजाच्या उन्नतीसाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आयुष्य वेचले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा समतेचा विचाराने प्रेरित होवून ते काम करत राहिले. मात्र त्यांच्यावर हल्ला करुन पुरोगामी शक्ती नष्ट करण्याचा प्रयत्न काही शक्तींनी केला. पण पुरोगामी शक्तीला वेळोवेळी पाठबळ देण्याचे काम जनतेने केले आहे. देशात प्रतिगामी शक्ती वाढत आहे. सत्ता हातात असल्याने पुरोगामी विचारांचा आवाज बंद करणे, लिखान थांबवणे हे प्रकार सुरु आहेत. यामधुन मुलभूत स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे. त्यामुळे आता प्रतिगामी शक्ती विरोधात लढण्याची गरज आहे. पुरोगामी शक्तीच हा लढा उभा करु शकतात. कोल्हापूर हे पुरोगामी शक्तीचे केंद्र आहे. त्यामुळे कॉम्रेड पानसरे यांच्या स्मृतीस्मारक लोकार्पणातून या लढाईला सुरुवात झाल्याचे सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, कॉम्रेड पानसरेंचे हे केवळ स्मृतीस्मारक नसून पुरोगामी विचार पुढील पिढीला देणारे हे स्मारक आहे. पानसरे यांनी नेहमीच पुरोगामी विचार जपला. संत, समाजसुधारक, वारकरी संप्रदाय यांनीही पुरोगामी विचारच महाराष्ट्राला दिला. पण सध्या ज्या पद्धतीने जुन्या विचारांनुसार देश चालवला जात आहे. यावरुन समतेचा विचार आणि राज्य घटना धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढीलकाळात कोणाच्या पाठीशी रहायचे याचा विचार जनतेने करणे गरजेचे आहे. समता, राज्यघटना, लोकशाहीच्या पाठीशी राहणे हिच कॉम्रेड पानसरेंना खरी स्मृतीवंदना असेल, असे थोरात यांनी सांगितले.

आमदार सतेज पाटील म्हणाले, पुरोगामी, समतेचा विचार पुढे घेवून जाणारी मंडळी निघून जाणे दूर्देवी आहे. पण त्यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवणं हे पुरोगामी विचाराच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच आहे. देशात विचारांच प्रदूषण झालं आहे. पुढील काही दिवसात निवडणुका लागतील देशात राजकारण सुरु होईल. यावेळी देश कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार जनतेने करणे गरजेचे आहे. विचाराच झालेल हे प्रदूषण दूर करण्यासाठी आणि देशाला पुढे घेवून जाण्यासाठी पुरोगामी विचार पुढे घेवून जावूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
खासदार डी. राजा म्हणाले, देशातील धर्मनिरपक्षतेची मुल्य बदलून धर्मांधाच्या माध्यमातून राजकारण केले जात आहे. देशात सुरु असलेली ही वाटचाल सामाजिक, आर्थिकदृष्ट्या धोकादायक आहे. त्यामुळे पुढील काळात घटना, समता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद हि मुल्य जोपासण्याची गरज असल्याचे खासदार डी. राजा यांनी सांगितले.

यावेळी कॉम्रेड पानसरे यांचा विवेक दी रिझन या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून जीवनपट उलगडण्यात आला. तसेच पानसरे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी कम्युनिस्ट पार्टीचे भालचंद्र कानगो, शिवसेनेचे विजय देवणे, स्मिता पानसरे यांचे भाषण झाले. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार राजीव आवळे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, उमा पानसरे, रघुनाथ कांबळे, उदय नारकर, शिवाजीराव परुळेकर, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते.

पक्षांतर बंदी कायद्यातील दोषांमुळे देश अस्थिर : श्रीमंत शाहू छत्रपती
देशात सध्या घटना दाबण्याचे काम सुरु आहे. मात्र घटना मजबूत असल्याने ती कोणीही मोडू शकणार नाही. पण या घटनेमध्ये काही पळवाटा राहिल्या आहेत. त्या भविष्यात दूर कराव्या लागणार आहे. आज पक्षांतर बंदीचा कायदा कुठेतरी कमी पडला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील राजकारणात उलथापालथ झाली असून देश अस्थिर बनला असल्याचे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितले.
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, देशात स्थिरता आणण्यासाठी समतेचे राज्य येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र एक प्रगत राष्ट्र आहे. पण येथील उद्योग गुजरातमध्ये पाठवत महाराष्ट्राच्या वाटल्या भाकरीचा तुकडा टाकला जात आहे. गेल्या दहा वर्षात जे घडले त्याला आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच प्रगत राहण्यासाठी पुढील काळात चांगल काय आणि वाईट काय याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने करणे गरजेचे आहे. देशातील वैचारिक परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे. या परिस्थितीला वैचारिक पद्धतीनेच लढा दिला पाहिजे. समतेचा, पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरमधूनच याला प्रतिकार होवू शकत असल्याचे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
Comrade Govind Pansare MemorialInauguration of Comrade Govind PansarePansare Memorialsharad pawar
Next Article