छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे लोकार्पण
उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत स्मारक उभारण्याचा निर्णय पूर्णत्वास : दृढ निश्चयाचे स्वागत
बेळगाव : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांच्या निनादात आणि मंत्रोच्चारात उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून प्लॅनेट हायड्रोलिकचे संचालक भूषण मंडोळकर, अश्विन मॅन्सन इंजिनिअरिंगचे संचालक अश्विन मन्नोळकर, अॅक्वा वॉल्स संचालक अनिल कवळेकर यांच्या हस्ते होमहवन, पूजा करून अभिषेक घालण्यात आला. इस्कॉनचे प्रभुजी माधव चरण, प्रभू गौरव प्रसाद, मुरली प्रभू यांनी पौरोहित्य पार पाडले. कपिलेश्वर मंदिर भजनी मंडळतर्फे महाआरतीनंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी स्मारक कमिटी व गणेश मंदिर देवस्थान यांच्यावतीने देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून अनगोळचे सामाजिक कार्यकर्ते व श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ प्रमुख उमेश कुऱ्याळकर यांच्या हस्ते प्रमुख देणगीदार तसेच स्मारकासाठी देणगीदाखल जागा देणारे अबिदअली हसन देसाई यांच्यासह संजय होळकर, नितीन मऱ्याप्पगोळ आणि महादेव पोटे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. देणगीदारांचाही सत्कार करण्यात आला. या स्मारकाची सुबक आणि सुंदर रेखाकृती साकारणाऱ्या अभियंत्या साक्षी सप्रे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे व देणगीदार तसेच प्रमुख निमंत्रित श्रीराम सेना हिंदुस्थान अध्यक्ष व समितीचे नेते रमाकांत कोंडूसकर, उमेश कुऱ्याळकर यांचा श्री गणेश मंदिर देवस्थान कमिटी व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कमिटी यांच्यावतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्मारकाची संकल्पना मांडणारे भूषण निलजकर व भास्कर निलजकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कमिटीच्यावतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाला औद्योगिक वसाहतीतील मालक, कर्मचारी, परिसरातील शिवभक्त, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. सूत्रसंचालन सुधीर नेसरीकर यांनी केले. आभार भूषण निलजकर यांनी मानले.
स्मारकाला हिंदू-मुस्लीम बांधवांचे सहकार्य
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जातीपातीला कधीच थारा नव्हता. स्वराज्यात सर्व अठरापगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत तसेच मुस्लीम समाजही गुण्यागोविंदाने राहत असे. आताच्या काळात काही ठिकाणी जातीपातीचे, धर्माचे राजकारण होत आहे. त्या काळाप्रमाणे आजही शिवरायांचे विचार आणि शिवरायांना मानणारे शिवभक्त आहेत. या स्मारकासाठी औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी आपली खुली जागा सढळ हस्ते मोफत उपलब्ध करून दिली आहे.
सदरची जागा कै. हसनसाब देसाई कै. सुरेश डोळेकर कै. शट्टूप्पा मऱ्याप्पगोळ, कै. गणपत पोटे यांच्या स्मरणार्थ अबिद अली हसन देसाई यांच्यासह संजय होळकर, नितीन मऱ्याप्पगोळ आणि महादेव पोटे यांनी उपलब्ध करून दिली. स्मारकासाठी औद्योगिक वसाहतीतील कारखानदार, कर्मचारीवर्ग यांनीही सढळहस्ते देणगी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक स्मारक उभारण्याचा निर्णय घेऊन तो पूर्णत्वास नेला. स्मारकासाठी खासकरून अबिद अली देसाई हे मुस्लीम समाजाचे असूनही आपली मोक्मयाची जागा देऊन मोलाचे सहकार्य केले. कमिटीने त्यांच्याच हस्ते 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भूमिपूजन केले. आज हे स्मारक पूर्णत्वास नेल्याबद्दल कमिटीच्यावतीने या सर्वांचा सत्कार करून आभार मानले.