भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताहाचे उद्घाटन
अधिकाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ : जनतेत जागरुकता निर्माण करणार
बेळगाव : कायद्याबद्दलची जागरुकता ही विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनतेमध्ये जागरुकता निर्माण करावी, जेणेकरून लोकांना माहिती मिळेल आणि लवकर न्यायही मिळेल, असे मत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केले. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, पोलीस खाते व कर्नाटक लोकायुक्त विभाग यांच्यावतीने ‘भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह’चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, देशामध्ये लोकपाल तर राज्यांमध्ये लोकायुक्त काम करत आहेत. आता लोक लोकायुक्त कार्यालयामध्ये निर्भयपणे जाऊन तक्रार नोंदवत आहेत. मात्र, अजूनही जागरुकता करणे आवश्यक आहे. सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारच्या सुविधा जनतेला सहज उपलब्ध होतील यासाठी कार्यरत राहावे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. याबद्दल जनतेला माहिती द्यावी व लोकांनीसुद्धा कोणत्याही कामासाठी लाच देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
लोकायुक्त अधीक्षक हनुमंतय्या यांनी कर्नाटक लोकायुक्त कायदा 1984 मध्ये अस्तित्वात आला. सरकारी अधिकाऱ्यांबद्दलच्या तक्रारींबाबत लोकांना त्यामुळे एक व्यासपीठ उपलब्ध झाले. राज्यस्तरावर लोकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे हे लोकायुक्तांचे काम आहे, असे त्यांनी नमूद केले. कोणतीही सत्ता कायमस्वरुपी नसते. महात्मा गांधी म्हणत त्याप्रमाणे आपण जनतेचे सेवक असून त्यांना सुविधा देण्यासाठी बांधिल आहोत. गरिबांच्या व वंचितांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचे काम सरकारी अधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असे मत जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी लोकायुक्त पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा यांनी उपस्थित सर्वांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली. याप्रसंगी डीसीपी निरंजन राज अरस, कायदा अधिकारी राजेश जंबगी, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, समाज कल्याण खात्याचे रामनगौडा कान्नोळी, जि. पं. चे योजना अधिकारी गंगाधर, दिवातारा यासह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.