मनपात पाळणा घराचे उद्घाटन
बेळगाव : बालदिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेत महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणा घर सुरू करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 14 रोजी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांच्या हस्ते पाळणा घराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांना या पाळणा घरात ठेवता येणार आहे. सदर पाळणा घरात स्वतंत्र फिडींग रुम तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी आवश्यक साहित्यदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ठिकाणी 1 आया व 1 शिक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. सदर पाळणा घर मुख्य कार्यालयात आधी ज्या ठिकाणी सत्ताधारी गटनेत्यांचा कक्ष होता त्या कक्षात सुरू करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक संदीप जिरग्याळ, मनपा आयुक्त शुभा बी., महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.