श्री स्वामी समर्थ मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात
बेळगाव : गोव्यातील न्हावेली-फणसवाडा येथे सुमारे पावणेदोन कोटी ऊपये खर्चून उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचे लोकार्पण गेल्या रविवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे प्रमुख जन्मजय विजयसिंह भोसले व मंदिराच्या कमिटीचे अध्यक्ष रोहिदास काळसेकर हे उपस्थित होते. या मंदिराच्या उभारणीत मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्वांचा याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, स्वामी समर्थांची प्रतिमा व फोटो देऊन सन्मान करण्यात आला. मंदिराच्या भूमिपूजनापासून मंदिर पूर्ण होईपर्यंत कोणतेही मानधन न घेता कार्यरत राहिलेल्या अभियंता आणि बेळगावचे स्वामी समर्थ आराधना केंद्राचे सचिव सुनील चौगुले व त्यांचे चिरंजीव आर्किटेक्ट चैतन्य सुनील चौगुले यांचा सन्मान करण्यात आला. मंदिर उभारण्यात चौगुले परिवाराने दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी व इतर सर्व वक्त्यांनी गौरवोद्गार काढले. याप्रसंगी चौगुले यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.