येळ्ळूर येथे शिवाजी महाराज मूर्तीचा आज लोकार्पण सोहळा
विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाप्रसादाचेही आयोजन
प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य चौकामध्ये भव्य अश्वारुढ पंचधातू शिवमूर्ती उभारण्यात येणार आहे. यासाठी आठ दिवसांपासून येळ्ळूरवासीयांनी जोरदार तयारी केली आहे. या मूर्तीचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 25 रोजी आयोजित केला आहे. सकाळी 10 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी मासेकर राहणार आहेत.
शिवरायांच्या अश्वारुढ मूर्तीचे उद्घाटन संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे डॉ. अमर अडके यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी गावातील विविध सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. चौथरा प्रवेशद्वारचे उद्घाटन अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या हस्ते केले जाणार आहे. राजमुद्रा उद्घाटन, ग्रंथालय प्रवेशद्वार पूजन, शिवचरित्र ग्रंथ पूजन, शिवचरित्र ग्रंथालय उद्घाटन, गंगा पूजन, ध्वज पूजन, जिजामाता प्रतिमा पूजन, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिमा पूजन, म. ज्योतिराव फुले प्रतिमा पूजन, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. गीतराधाई उत्सवशाही या सांस्प़ृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन रात्री 8 वाजता करण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्य संघटना व ग्रामस्थांच्यावतीने हा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी बेळगाव शहरामध्ये राजांच्या अश्वारुढ मूर्तीचा मिरवणूक कार्यक्रम पार पडला. सोमवार दि. 19 रोजी येळ्ळूर गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रविवारी मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे.