सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण त्वरित करा
आम आदमी पार्टीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण त्वरित करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी आम आदमी पार्टी बेळगाव शाखेने केली आहे. जिल्हा मुख्य सचिव अनिस सौदागर यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सरकारने 180 कोटी रुपये मंजूर केले आहेत. इमारतीचे बांधकाम जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच करण्यात आले. बांधकाम पूर्ण झाले असले तरी तेथे अद्याप वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. जिल्ह्याच्या अनेक भागातून रुग्ण बेळगावात उपचारासाठी येत असतात. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सेवा उपलब्ध झाल्यास रुग्णांना आणखी सोयीचे होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन हॉस्पिटलच्या त्वरित लोकार्पणासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.