For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्याच पावसात मुंबई गाळात

06:22 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
पहिल्याच पावसात मुंबई गाळात
Advertisement

मुंबईत रविवारी रात्री 1 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सहा तासांच्या या पावसाने मुंबापुरीची पुन्हा तुंबापुरी झाली. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे अनेकांचा संसार वाहुन गेला. मान्सूनपूर्व नालेसफाई केल्याचा दावा पालिकेकडून दरवर्षी करण्यात येतो मात्र पहिल्याच पावसात मुंबई गाळात जाते. 250 कोटी ऊपये केवळ नालेसफाई करण्यासाठी खर्च केले जातात. तरीही मुंबई तुंबते आणि मुंबईकर दरवर्षी गाळात जातो. 20 मे ला लोकसभेच्या मुंबईतील निवडणुका झाल्या या निवडणुकीत सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, नेते यांच्यासोबतच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी निवडणूक कामात होते. मग गाळ काढण्याचे ज्या कंत्राटदारांना कंत्राट दिली त्या कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच निवडणूक कामात व्यस्त असल्याने काही ठिकाणी गाळ काढला मात्र तो उचलला नाही. पुन्हा तो गाळ नाल्यात गेला तर काही ठिकाणी नालेसफाईच न झाल्याने पहिल्याच पावसाने मुंबईकरांना चांगलेच वेठीस धरल्याचे सोमवारी बघायला मिळाले.

Advertisement

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे, गेल्याच आठवड्यात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणांचा पाऊस पाडला. या पावसात भिजताना सुखावलेल्या जनतेला दहा दिवस होत नाही तोवर, मुसळधार पावसाने रौद्रऊप धारण करत जागे केले आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड येथील गावच्या गावे ही दोन दिवसापासून पाण्याखाली गेली आहेत, तर महानगरातील मुंबई, ठाणे, पालघर या भागातही कालच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

ग्रामीण भागात पावसाच्या पाण्यामुळे नद्यांची पातळी वाढल्याने गावाला पुराचा धोका संभवतो मात्र मुंबई ठाण्यात पावसामुळे होणारे नुकसान हे काही अंशी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होत असल्याचे वारंवार सिध्द झाले आहे. मुंबईत पावसाळ्याआधीची नालेसफाई हा कायम चर्चेतला विषय असतो. मुंबई महापालिकेचे राजकारण हे केवळ मुंबईतील नालेसफाई आणि मुंबईतील खड्डे या दोनच विषयावर होते. आता 2020 नंतर यात कोरोनाच्या तिसऱ्या विषयाची भर पडली. मात्र मान्सूनपूर्व नालेसफाई हा नेहमीच मुंबई महापालिकेचा राजकारणाचा विषय राहिलेला आहे. मुंबईत लहान मोठे असे जवळपास दोन हजार किलोमीटरचे नाले आहेत. मुंबई आणि उपनगरात 309 मोठे नाले आहेत आणि 1508 लहान नाले आहेत. त्याच्या मान्सूनपूर्व साफसफाईसाठी पालिका जवळपास 250 कोटी रूपये खर्च करते, मात्र तरीही सालाबादप्रमाणे नेहमी मुंबईची तुंबई होते.

आत्तापर्यंत जर मुंबईत मोठा पाऊस झाला तर काही सखल भागात पाणी साचले जायचे मात्र काल झालेल्या काही तासांच्या पहिल्याच पावसात मुंबईतील सर्व भागात पाणी साचले. प्रशासन आणि शासनाकडून रविवारी 300 मि.मी एवढा पाऊस पडल्याचे तसेच मुंबईच्या भौगालक परिस्थितीचे कारण दिले गेले असले तरी, भौगोलिक दुष्ट्या मुंबई ही जरी अतिवफष्टी भागात मोडत असली तरी शहरात पाणी येऊन ते तुंबणं यावर पालिकेकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात आल्या. मग तो

ब्रिमस्टोवॅड प्रकल्प असो किंवा दादर हिंदमाता भागात उभ्या बांधलेल्या भूमिगत टाक्या (अंडरग्राऊड पॉंड) प्रकल्प असो या यंत्रणेतील सुधारणेवर म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं आहे का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

पुण्यात व मुंबईत झालेल्या हीट अॅन्ड रन प्रकरणानंतर जागे झालेल्या सरकारने थेट अनधिकृत पब, बार यांच्यावर बुलडोझर फिरवत जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या विरोधात कडक पावले उचलताना राज्य विधीमंडळाने पेपरफुटी विरोधात कडक कायदा करण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडले आहे, जर पेपरफुटी आणि हीट

अॅdन्ड रन प्रकरणात सरकार कठोर भूमिका घेत असेल तर नालेसफाईची कामे घेणारे कंत्राटदार, या कामांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी यांच्यावर अंमल राहण्यासाठी सरकार कठोर होणार आहे की नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काल मुख्यमंत्र्यांनी मुंबईत एकाच वेळी 300 मी.मी इतका पाऊस झाल्याने मुंबईत पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अशा वक्तव्यामुळे प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार यांना अप्रत्यक्ष अभय मिळते. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटले या दुर्घटनेत तब्बल 23 लोकांचा बळी गेला होता, मात्र यावेळी तत्कालीन जलसंधारण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी हे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे हास्यास्पद वक्तव्य केले होते. मात्र या धरणफुटीमागील खरे खेकडे हे अद्यापही बाहेर आले नाहीत.

सध्या मुंबई महापालिकेत प्रशासन असल्याने पालिकेचे कारभारी हे मुख्यमंत्रीच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंबईत 300 मी.मी इतका पाऊस झाल्याचे बोलून जबाबदारी झटकणे योग्य नाही. गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक गावे, बाजारपेठा ह्या पाण्याखाली आहेत, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांनी पूरनियंत्रण रेषा ओलांडल्यास पुढील संभाव्य दुर्घटना टाळ्ण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. प. महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या पूरपरिस्थितीच्या वेळी कर्नाटकातील आलमट्टी धरणातून वेळीच पाणी सोडले असते तर सांगलीचा धोका कमी झाला असता, असे नंतर सांगण्यात आले. मात्र मुंबईतील परिस्थिती ही मानव निर्मित आहे, मुंबईत नद्यांचे नाले झाले याच नाल्यांमधून किती गाळ काढला यापेक्षा नाल्यातील प्रवाह सुरळीत झाला का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मुंबईतील मान्सूनपूर्व कामाचा आढावा हा मार्च किंवा एप्रिलमध्ये घेण्यास सुरूवात केली जाते, मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता, त्यातच मुंबईची निवडणूक शेवटी 20 मे ला झाली. दरम्यानच्या काळात निवडणुकीची असलेली आचारसंहिता यामुळे प्रशासनाने घेतलेले निर्णय तर दुसरीकडे निवडणूक कामात राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे अधिकारी-कर्मचारी असल्याने नाले सफाईऐवजी कंत्राटदारांनी हात सफाई केल्याचे नाकारता येत नाही. आता पालिकेच्या नालेसफाई कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आज अधिवेशनात होईल, वेळोवेळी कॅगच्या अहवालातही नालेसफाईच्या कामाबाबत ताशेरे ओढले गेले आहेत, पालिकेत प्रशासन असो शासन असो की अजून कोण? गाळ काढणारे कंत्राटदार तेच असतात आणि गाळात जाणारे मुंबईकर पण तेच असतात.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.