भंडाऱ्याच्या उधळणीत तालुक्यात उदं गं आई उदं...चा जयघोष
विविध ठिकाणी सामूहिक पडल्या भरण्याचा कार्यक्रम : महाप्रसादाचे आयोजन, भाविकांची गर्दी
वार्ताहर /किणये
तालुक्यात मंगळवारी भंडाराच्या उधळणीत उदं गं आई उदं... चा जयघोष झाला. अनेक गावांमध्ये सामूहिक पद्धतीने पडल्या भरण्याचे कार्यक्रम झाले. बहुतांशी ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावागावांमध्ये झालेल्या या यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त सर्वत्र उत्साह दिसून आला. तालुक्यातील लाखो भक्तांचे सौंदत्ती येथील यल्लम्मादेवी हे श्रद्धास्थान आहे. यामुळे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त गावागावातील भाविक मोठ्या संख्येने यल्लम्मा डोंगरावर गेले होते. गेल्या आठ दिवसापासून भक्त मोठ्या संख्येने यल्लमा डोंगरावर दाखल झाले होते. यल्लम्मा डोंगरावरही भाविकांनी पडल्या भरल्या. तसेच रेणुकादेवीचे दर्शन घेतले आणि आपापल्या गावाकडे परतीचा मार्ग धरला. काही भाविक सोमवारी सकाळी तर काही सोमवारी रात्री गावात दाखल झाले. गावच्या बाहेर आंबा, काजू आदी बागांच्या ठिकाणी किंवा तलावाच्या शेजारी, मोकळ्या जागेमध्ये हे सर्व भाविक तंबू बांधून राहिले. मंगळवारी मात्र यल्लम्मा डोंगरावर जाऊन आलेल्या भाविकांनी व गावकऱ्यांनी मिळून देवीची यात्रा आपापल्या गावाजवळ उत्साहात साजरी केली. या यात्रेची गावकऱ्यांनीही अगदी जोमाने तयारी केली. दानशूर व्यक्तीने आपापल्या परीने देणग्या दिल्या. तसेच काही गावांमध्ये वर्गणीही काढण्यात आली.
दुपारी सर्व महिलांनी उदं गं आई उदं... असा जयघोष करीत सामूहिक पद्धतीने पडल्या भरण्याचा कार्यक्रम केला. यावेळी भक्तांनी भंडाऱ्याची उधळण केली होती. तसेच काही गावांमध्ये पारंपरिक वाद्यांचा गजरही झाला. त्यामुळे या गावांमध्ये यात्रा भरवण्यात आली होती. त्या ठिकाणी भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली पहावयास मिळाली. दुपारनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पिरनवाडी येथील तलावाजवळ भक्तांची मोठ्या संख्येने यात्रेला गर्दी झाली होती. तसेच बहाद्दरवाडी येथील विठ्ठलाई मंदिरकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला यात्रा करण्यात आली. याचबरोबर कर्ले, मंडोळी आदी ठिकाणी हा यात्रोत्सव झाला. नावगे गावातील रामलिंग मंदिराजवळील तीर्थजवळ पडल्या भरण्याचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच काही भाविक अद्यापही यल्लम्मा डोंगरावर जाऊ लागले आहेत.
कडोलीत पडल्या भरण्याचा कार्यक्रम उत्साहात
उदं गं आई उदं च्या जयघोषात कडोली येथे रेणुका देवीच्या भक्तांच्या अमाप उत्साहात देवीच्या पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. सालाबादप्रामणे सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा आटोपून आल्यानंतर मंगळवारी येथील आमराईतील श्री लक्ष्मी देवीच्या गदगेसमोर श्री रेणुका देवीच्या पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. हजारो रेणुका देवीच्या भक्तांच्या उपस्थितीत देवस्थान पंच कमिटी आणि हक्कदारांनी धार्मिक विधी पार पाडले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. प्रथम देवस्थान पंच कमिटीतर्फे रितसर पडल्या भरण्यात आल्या. त्यानंतर हक्कदारांनी गाऱ्हाणे घातल्यानंतर सर्व विधी पार पडल्या. यावेळी असंख्य भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
धामणे येथील नौगोबा यात्रा उत्साहात
धामणे येथे श्री यल्लम्मा देवीची नौगोबा (मळ्यातील) यात्रा मंगळवार दि. 30 रोजी प्रतीवर्षाप्रमाणे येथील बनकुडी तलावाशेजारी गावातील शेकडो भक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पार पडली. प्रतीवर्षाप्रमाणे धामणे गावातील यल्लम्मा देवीचे महिला आणि पुरूष भक्त 22 जानेवारी रोजी यल्लम्मा देवीच्या डोंगराला गेले होते. त्यानंतर शाकंभरी पौर्णिमेला 25 रोजी देवीच्या पडल्या भरण्यात आल्या व देवीची डोंगरावरील यात्रा आटोपून सोमवारी भाविकांचे आगमन येथील मळ्यातील यात्रेच्या ठिकाणी झाले. मंगळवारी भक्तांच्या देवीच्या संयुक्तरित्या पडल्या भरुन विधिवत पूजन करण्यात येवून उत्कार घालण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाने या यात्रेची सांगता झाली.