For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या यादीतही दक्षिणेची पाटी कोरीच!

11:44 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या यादीतही दक्षिणेची पाटी कोरीच
Advertisement

भाजपला अद्याप सापडेना’व्हिनेबल’ उमेदवार : उमेदवार न ठरल्याने जोर चडेना कार्यकर्त्यांमध्ये

Advertisement

पणजी : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात तब्बल 195 उमेदवारांची घोषणा केलेल्या भारतीय जनता पक्षाने बुधवारी दुसरी यादी जाहीर करून आणखी 72 उमेदवारांची घोषणा केली. पहिल्या यादीत उत्तर गोव्यासाठी श्रीपाद नाईक यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर दक्षिणेसाठी कोण? अशी उत्सुकता तमाम गोमंतकीयांच्या मनात निर्माण झाली आहे. मात्र दुसऱ्या यादीतही तिचे निरसन करण्यात भाजपला यश आलेले नाही. त्यामुळे दक्षिणेतील तिढा अद्याप कायम राहिला आहे. केवळ दोन जागा असलेल्या गोव्यात भाजपतर्फे उत्तरेत गत पाच निवडणुकीत श्रीपाद नाईक यांनी अधिराज्य गाजवले आहे. आता ते सहाव्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार असून यावेळीही त्यांचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे. दक्षिण गोव्यात मात्र भाजपला उमेदवार निवडताना अक्षरश: नाकेनऊ आलेले आहेत. खरे तर यापूर्वी हा मतदारसंघही भाजपच्याच ताब्यात होता. मात्र गत निवडणुकीत तेथे काँग्रेसच्या फ्रान्सिस सार्दिन यांनी बाजी मारली. मात्र यंदा तेथील उमेदवार ठरविणे भाजपला अशक्य झाले आहे.

दोघेजण इच्छूक नसल्याचे स्पष्ट

Advertisement

परिणामस्वरूप काल बुधवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीतही दक्षिणेसाठी उमेदवाराची  घोषणा करण्यात यश आलेले नाही. या मतदारसंघासाठी तब्बल पाच नावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी आमदार दिगंबर कामत आणि सभापती रमेश तवडकर यांनी आपण इच्छुक नसल्याचे आधीच कळविले आहे. त्यामुळे उर्वरित तिघांमधून एकाची निवड करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यातून दामू नाईक यांचे नावही मागे पडले आहे. आता बाबू कवळेकर आणि नरेंद्र सावईकर ही दोनच नावे चर्चेत राहिली होती.

महिला उमेदवाराची रणनीती पडली बरीच महागात

दरम्यानच्या काळात अचानकरित्या या मतदारसंघात महिला उमेदवार देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली व त्यासाठी पात्र उमेदवाराचा शोध सुरू झाला. मात्र ही वेगळीच रणनीती भाजपला नाही म्हटली तरी बरीच महाग पडली. त्यातून अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यातून पदरात तर काहीच पडले नाही, उलट उमेदवार निश्चितीत आणखी काही दिवसांचा कालावधी वाया गेला.

दुसऱ्या यादीतही नाही नाव

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिल्लीच्या अनेक वाऱ्याही केल्या. परंतु दक्षिण गोव्यातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात त्यांना यश आलेले नाही. परिणामस्वरूप दि. 11 मार्च रोजी मान्यता मिळालेल्या आणि काल बुधवारी दि. 13 रोजी घोषणा झालेल्या दुसऱ्या यादीतही दक्षिण गोव्यासाठी उमेदवाराचे नाव झळकलेले नाही.

... तरीही मुख्यमंत्र्यांचा झंजावती दौरा

आश्चर्यकारक प्रकार म्हणजे उमेदवाराचे नाव जाहीरसुद्धा झालेले नसले तरीही भाजपने दक्षिणेसाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यातूनच बुधवारी संपूर्ण दिवसभर स्वत: मुख्यमंत्री दक्षिणेच्या दौऱ्यावर होते. त्यात फोंड्यासह अन्य अनेक भागात त्यांनी सभा आणि वैयक्तिक गाठीभेटीतून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच मतदारांकडून भाजप ‘उमेदवारा’च्या विजयाची ’गॅरंटी’ ही मागितली.

Advertisement
Tags :

.