For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजीत काजू महोत्सवास शानदार प्रारंभ

10:58 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
पणजीत काजू महोत्सवास शानदार प्रारंभ
Advertisement

तीन दिवसांत काजूबाबत सर्वकाही : काजूच्या विविध पदार्थांची रेलचेल,फेणी, हुर्राकबरोबर संगीत मेजवानी

Advertisement

पणजी : राज्यात आज काजू उत्पादन खूप प्रमाणात घटले आहे. काजू उत्पादन वाढवायचे असेल तर अगोदर काजू लागवड वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. राज्यातील वनविकास महामंडळाच्या मालकीच्या डोंगरावर अनेक शेतकरी भाडे तत्त्वावर काजू बागायती चालवत आहेत. महामंडळाने त्यांना पूर्ण पाठिंबा, अधिकार देणे अपेक्षित आहे, तरच राज्यातील डोंगराळ भागातील काजू लागवडीची भरभराट होईल. असे प्रतिपादन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले. पणजी कांपाल येथे आयोजित काजू महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी वनविकास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. देविया राणे, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, आमदार दाजी साळकर, वन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नंदकुमार परब, तसेच प्रधान वनसंरक्षक व इतर वन अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, काजूचे अनेक औषधी फायदे आहेत. त्यामुळे या पारंपरिक आणि बहुमूल्य फळाचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. गोव्याच्या समृद्ध वारशाचे ते एक प्रतीक आहे आणि त्याच्या भविष्यकाळाची हमी आहे.

भविष्य सुरक्षित करणारा सोहळा

Advertisement

गोमंतकीयांसाठी अनेक पिढ्यांपासून, काजूचे झाड म्हणजे जीवनाच्या स्रोताहून अजून खूप काही आहे. संस्कृतीच्या तलम वस्त्रात काजू एका धाग्याप्रमाणे विणलेला आहे. हा काजू महोत्सव त्याच वारशाचे दर्शन घडविणारे एक व्यासपीठ आहे. तसेच हा काजू महोत्सव म्हणजे गोव्याच्या काजू उद्योगाचे सुरक्षित भविष्य उभारण्याचा सोहळा आहे. आमच्या काजूची जगभर प्रसिद्धी व्हावी हा या मागचा उद्देश आहे. हा राज्य महोत्सव झाला असून भविष्यात काजू उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे, असे वनविकास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. देविया राणे यांनी नमूद केले आहे.

काजूसंबंधित 78 हून अधिक दालने

काजू महोत्सवामध्ये विविध दालने मांडण्यात आली आहे. येथे पारंपरिक काजू प्रक्रिया, प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत. 78 हून अधिक फूड स्टॉल्सवर काजू- आधारित स्वादिष्ट पदार्थांची दालने खवय्यांचे आकर्षण आहे. दालनांमध्ये खास काजूपासून बनविलेली अस्सल फेणी, हुर्राकचा स्वादही रसिकांना घ्यायला मिळत आहे. फेणी, हुर्राक कशा प्रकारे बनविली जाते याचे मार्गदर्शन या महोत्सवात केले जात आहे. महोत्सवात ध्वनी भानुशाली यांच्या लाईव्ह संगीत मैफलीचे आयोजन केले होते. याचा उपस्थित रसिकांनी आनंद लुटला.

शेतकरी, उद्योजकांसाठी महत्वाचा

गेल्या वर्षी हा महोत्सव यशस्वी झाला, त्याचप्रमाणे चांगली प्रसिद्धी मिळाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वनमंत्री विश्वजित राणे यांचा चांगला पाठिंबा  मिळाला. यंदाही त्यांच्या पाठिंब्याने हा महोत्सव सुऊ झाला आहे. हा महोत्सव गोव्यामधील काजू शेतकरी आणि स्थानिक उद्योजक यांच्यासाठी खूप आवश्यक असणारा प्रकाशझोत टाकणारा आहे, ज्यामध्ये ग्रामीण महिलांचे स्वयंसहाय्य गट यांना महत्त्व देण्यात येत आहे. स्थानिक उद्योगांना त्यांनी वैशिष्ट्यापूर्ण रितीने बनविलेली काजू उत्पादने समोर आणण्याकरिता व्यासपीठ मिळत आहे. त्यामुळे केवळ त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार नाही तर त्याच बरोबर समुदायांच्या अंतर्गत आर्थिक वृद्धी करण्याकरिता नवीन दरवाजे उघडले जातील. ज्यामुळे काजू क्षेत्रात खऱ्या अर्थाने आम्ही स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनतील, असे डॉ. देविया राणे म्हणाल्या.

गोव्याच्या जमिनींचे रक्षण करणे गरजेचे

आजच्या युवा पिढीने काजू बागायतीकडे पाठ फिरविली आहे. गोमंतकीय जमिनी आज कोट्यावधींच्या भावाने विकल्या जात आहेत. सोन्यापेक्षा जास्त भाव आज गोमंतकीय जमिनींना आला आहे. त्यामुळे गोमंतकीय जमिनींचे रक्षण करणे गरजेचे आहे. आज काजूला चांगली मागणी आहे पण शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही. यावर कृषी खाते आणि वन विकास मंडळाने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले. गोवा आणि काजू यांचा पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहे. काजू महोत्सव ही संकल्पना निर्माण झाल्यापासून गोमंतकीय काजूचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार प्रचार होत आहे. जो आणखी करण्यावर आपण भर देणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे स्थानिक शेतकऱ्यांना या महोत्सवाचा फायदा नक्की होणार आहे, असे आमदार दाजी साळकर म्हणाले.

 काजू, आंबा पिक 50 टक्के घटले

हवामानात सातत्याने होणारे विचित्र बदल गोव्यातील आंबा, काजू पिकास हानिकारक ठरत असल्याने यंदा त्या दोन्ही पिकांमध्ये घट झाल्याची माहिती कृषी संचालक नेव्हल आफोन्सो यांनी दिली. काजू महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या सत्रात ते बोलत होते. हवामान बदलाचा फटका गोव्यतील काजू, आंबा पिकाला बसला असून अवकाळी पावसाने दोन्ही पिकांचा हंगाम काही दिवस पुढे गेल्याने उत्पादन घटले. नोव्हेंबरमध्ये पावसाचा मोठा फटका बसला. त्यानंतर थंडी फारशी पडली नाही. या दोन मुख्य कारणांमुळे दोन्ही पिकांच्या उत्पादनास विलंब झाला. उत्पादनही कमी आले. त्यामुळे दोन्ही पिकांचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटले, असे ते म्हणाले. काजू उत्पादन कसे वाढवायचे, हवामान बदलातील संकटे कशी दूर करायची याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यावर सत्रात चर्चा करण्यात आली.

झाडांची काळजी घेतल्या उत्पादन वाढणार

गोव्यात काजू हे मुख्य पीक असून नंतर आंबा, नारळ पिके येतात. ग्रामीण अर्थव्यवस्था काजू पिकावर आधारित असून मोठ्या संख्येने कुटुंबे काजूवर जगतात. जुने आणि नवे तंत्रज्ञान यांची सर-मिसळ कऊन उत्पादन वाढवण्यावर कृषी खाते भर देत असून त्यांचा वापर केल्यास उत्पादन वाढवता येऊ शकते. त्यासाठी नैसर्गिक पद्धत खते, किटकनाशके वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. काजू पिकले की ते काढण्यासाठी जातात. एरव्ही त्या झाडांकडे फारसे लक्ष देण्यात येत नाही. त्या झाडांची देखभाल नीट केली तर उत्पादन वाढेल, असे आफोन्सो यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.