आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघत बसलं…
कृष्णात डोणे महाराजांनी केली भाकणूक कथन : श्रीपेवाडी हालसिद्धनाथ यात्रा उत्साहात संपन्न : अंबिल कलश मिरवणुकीत महिलांचा सहभाग : पालखी मिरवणुकीने यात्रेची सांगता
महेश शिंपूकडे/निपाणी
देशात जाळपोळ दंगा धोपा वाढत राहीलं. संप हरताळाची वेळ देशावर येईलं. नोकरवर्ग दडून बसलं. भारत देशात मोठी आंदोलने होतीलं. देशात मोठा नवा कायदा येईलं. आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघत बसलं. जाती जातीची भांडण लागतीलं. महागाईचा भस्मासूर सुटलं. पेट्रोल इंधन-गॅस दरवाढीने जनता हैराण होईलं. सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईलं. बसव्याचं शिंगाट सोन्याच होईलं. बसवाराजा पालखीतून मिरवलं. कुळव्याच्या बाळाला मोठा विचार पडलायं. शेतीचा भाव गगनाला जाईलं. शेताची किंमत सोन्याहून पिवळी होईलं. शेतीसाठी देशात खून पडतीलं.
पैशाच्या जोरावर न्याय मिळेलं, अशी हालसिद्धनाथांची भाकणूक कृष्णात डोणे महाराज-वाघापूर यांनी केली. विजयादशमी दसऱ्यानंतर द्वादशीला होणारी श्रीपेवाडी येथील हालसिद्धनाथ यात्रा मंगळवारी पार पडली. यात्रेच्या निमित्ताने पूजाविधी, अभिषेक, पालखी मिरवणूक, ढोल वादन, जागर, फटाक्यांची आतषबाजी, हत्यार खेळवणे, हरी भजन, सांप्रदायिक गोविचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम पार पडले. बुधवारी पहाटे पहिल्या भाकणुकीचा मान असणारी हालसिद्धनाथांची भाकणूक कृष्णात डोणे महाराज यांनी कथन केली. यावेळी श्रीपेवाडीसह परिसरातील भाविक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
श्रीपेवाडी प्रति आप्पाचीवाडी होईल
मेघयान मळा, आकाशाच्या फळा, अमृताच्या धारा, हाय बाळांनो मेघ उदंड हाय. बाळांनो बांधा आड मेघाची कावड गैरहंगामी हाय. मेघाच्या पोटी आजार हायं. पीक पाऊस याचा कालमान बदलत जाईल. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा हायं. त्याच्यामागे अंधार आणि पुढबी अंधार हायं. कोल्हापूरचं राजघरानं क्षत्रिय वंशाचा हायं. पिंजऱ्यातला राघू भाषण करतोयं. धर्माची गादी हायं. धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा. हालसिध्दनाथांचा जयजयकार करा. श्रीपेवाडी गावातील बसवान देवालय हालसिद्धनाथांची पवित्र भूमी हायं. श्रीपेवाडी प्रति आप्पाचीवाडी होईल.
बैलाची किंमत बकऱ्याला येईल
खरीप पिक बहुत होईल. उदंड पिकल. दीड महिन्याचे धान्य येईल. पीकल तांबडी रास मध्यम पीकल. पांढर धान्य उदंड पिकल, मौलाना विकल. मूग हरभरा कडक राहील. गव्हाची पेंडी मध्यम पिकल, मोलान विकल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. धान्य दारात, वैरण कोपऱ्यात अशी परिस्थिती निर्माण होईल. वैरण सोन्याची होईल. वैरण-धान्याच्या चोऱ्या होतील. सांभाळून ठेवा. मेंढी मोलाची होईल. मेंढी पालखीतून मिरवल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याचा भाव एक लाखावर जाईल. बक्रयाची किंमत कोंबड्याला येईल. धनगराचा पोर मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल. भाकरी सांभाळून खावा. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय.
विज्ञानाची प्रगती घातक ठरलं.
व्यापारी लोक शेतकऱ्यांची लुबाडणूक करतील. तंबाखूची पेंडी मध्यम पिकल. मोलान विकल. तंबाखूचा तंबाखू होईल. जग दुनियेत धुणकारी पडल. दुनिया कालावून जाईल. मायेचा लेकरू मायेला ओळखणार नाही. गाईचं वासरू गाईला भेटणार नाही. घरातून गेलेला माणूस परत येईल अशी आशा धरू नकोसा. ठेचला मरण हाय. मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील. मनुष्याचे जगणं धर्माचं, मरण हुकमाचा होईल. हा सारा मायेचा बाजार हाय. माझं माझं म्हणू नका. सारं काही पाण्याच्या बुडबुड्यासारखा हाय. येत्या काळात पाण्याचा कप विकत मिळेल. पाण्यासाठी रांगा लागतील-पाळी लागल. मरीआईची वारी फिरल. अठरा तरेच आजार मनुष्याला होतील. डॉक्टर लोक हात टेकतील. आड चुकल पण खेडं चुकणार नाही. कोरोना पेक्षा मोठी महामारी येईल. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल. विज्ञानाची प्रगती घातक ठरलं.
राजकारणात लोक देवधर्म विसरतील
राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणात दंगाधोपा होईल. पक्षा पक्षात दोन पक्ष पडून झंजावात लागल. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील. सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. भांडून खेळतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील. राजकीय पक्ष घाण करतील. देशाच्या राजकारणाला बिघड लागल. कर्नाटक राज्याच्या राजकारणात मोठी उलताबाद होईल. जातीयवादी राजकारणाला उधाण येईल. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी इर्षा लागल. सत्तेसाठी चढाओढ लागल. राजकारणात लोक देवधर्म विसरून जातील. पैसा न खाणारा राजकारणात शोधून सापडणार नाही. लाच लुचपत भ्रष्टाचाराला देशात उधाण येईल. राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यात अडकून पडतील. तुरुंगात जातील. सीमा भागाचं राजकारण ढवळून निघल. सीमा भागात मोठा गोंधळ होईल. आंदोलने पेटतील. निपाणी भागाच भविष्य मोठा आहे.
तरुण पिढी वाम मार्गाला लागल
चाललया चाललया हे जगाचं भविष्य चाललया. कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलया. रात्री बाराच्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी पडतया. कलियुगात पाप वाढले. भावाला बहीण ओळखेना. बहिण-भावाच्या नात्याला कलंक लागेल. सासऱ्याला सून ओळखना झालीया. जगात डोंगराएवढे पाप आणि दोऱ्याएवढं पुण्य राहीलया. दोऱ्याच्या आधारावरच डोंगर तरलाया. सत्यवान लोक फासावर गेल्यात. पाच बोटांनी मनुष्यान धरम करावा. धर्माची बाजू पुढे राहणार आहे. नऊ वर्षाची मुलगी भरतार मागल. बारा वर्षाची मुलगी आई होईल. कलियुगात तरुण पिढी वाम मार्गाला लागल. उगवत्या सूर्याला संकट पडलया. उगवता पेटल मावळता विझल. साताऱ्याच्या गादीवर फुल पडतील. येईल येईल राज गुंडांचे येईल.
कष्टाची भाकरी आनंदात ठेवेल
चैत्राच्या महिन्यात गाई माळाला जातील. श्रावण महिन्यात गाई गंगेला जातील. नदीकडची जमीन वसाड पडल. मोठा जलप्रलय होईल. कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठे भगदाड पडेल. भाग जन्म होईल. सत्यानं वागाव गर्वाणू वागू नये. गर्वाचे घर खाली हाय. होईल भुईकंप होईल. कृष्णा काठाला नऊ लाख बांगड्या फुटतील. वादळ भूकंपाने जगाची उलथापालत होईल मोठं नुकसान होईल. सांभाळून राहा. जंगलातलं पक्षी गावात येतील गावातलं मनुष्य जंगलात जातील. भगवा झेंडा देशावर राज्य करल. सभेतून मिरवल. नीतिमत्तेन राशीला तर चार दिवस सुखाचे खाशीला. करशील सेवा तर खाशीला मेवा. करशील चाकरी तर मिळेल भाकरी अशी भाकणूक कथन केली.
कोरिया देश जगात घातक ठरलं
देशात अतिरेकी लोक येतील. घोटाळे करतील. बॉम्ब स्पोट होतील. शहरालगत शहरे उद्ध्वस्त होतील. जगाचा चौथाई भाग उध्वस्त होईल. ओसाड पडल. युद्ध होतील. जगभरातील अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील. युद्ध खेळण्याची जणू काही स्पर्धाच लागेल. भारत-पाकिस्तान छुप युद्ध होईल. भारतीय सैनिक छातीची ढाल करून सीमेवर लढत राहतील. भारत मातेचा जयजयकार करतील. चीन देश भारतावर आक्रमण करेल. भारतीय सैनिक मात्र त्यांना परतावून लावतील. कोरिया देश जगात घातक ठरल. होईल होईल कापाकापी होईल. रक्ताचे पाठ वाहतील. माणसाला माणूस खाऊन टाकल. दिवसाढवळ्या चाकू दरोडे पडतील. दागिने पैसा घातक होईल. सांभाळून रहा. कानानं ऐकशीला डोळ्याने बघणार नाहीसा. रेल्वे मोटारीचे मोठे अपघात घडतील.