For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गीतेत भगवंत कर्तव्याला स्वधर्म असे संबोधतात

06:52 AM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
गीतेत भगवंत कर्तव्याला स्वधर्म असे संबोधतात
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

सांख्य तत्वज्ञानानुसार प्रत्येक देहात आत्मस्वरूपाचा वास असतो. ते देहात शिरले की, देहाचा आकार धारण करते आणि देहाच्या सहवासाने त्याला आपण म्हणजे हा देह असे वाटू लागते. त्यामुळे देह सुखी तर आपण सुखी अशी त्याची भावना होते. देहाला जरा कुठे खुपले, दुखले की, त्याला वाईट वाटू लागते. अर्थात मनुष्य सोडून इतर योनी ह्या केवळ भोगयोनी असल्याने ह्या देहापेक्षा आपले स्वरूप वेगळे आहे ह्याची जाणीव इतर योनीत होत नाही पण माणसाला देवाने बुद्धीचे वरदान दिलेले आहे. त्यामुळे केलेल्या कर्मातून पाप किंवा पुण्य निर्माण होते आणि ते भोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो हे माणसाच्या लक्षात येते तसेच त्यामुळे आपले कित्येक जन्म झालेले आहेत हेही समजते. हे जन्म मृत्यूचे चक्र थांबवून आपल्या आत्म्याला परमेश्वरात विलीन करायचे असेल तर माणसाने कसा विचार करायला हवा, कसे वागायला हवे, ह्याचे मार्गदर्शन ह्या अध्यायात भगवंत अर्जुनाला करत आहेत.

सर्वप्रथम परमतत्व सोडून सर्व गोष्टी नाश पावणाऱ्या आहेत हे त्यांनी सांगितले. आपल्या हातून स्वकीयांचा वध होणार आणि ते पाप आपल्या माथी बसणार, असे अर्जुनाच्या मनाने घेतले होते. त्यामुळे तो हे युद्ध टाळू पहात होता. त्यावर भगवंतानी त्याला सांगितले की, समोर दिसणारे स्वकीयांचे देह कधी ना कधी नाश पावणार आहेत. त्यामुळे तू त्यांना मारलेस तरच ते मरणार आहेत हे मनातून काढून टाक. त्यांचे समोर दिसणारे देह नाश पावले तरी त्यांच्या आत्म्याला दुसरा देह लाभणार आहे. त्यामुळे आत्ता असलेले त्यांचे देह त्यांच्या कुकर्माचे प्रायश्चित्त म्हणून नष्ट होणार आहेत आणि त्यासाठी तू केवळ निमित्तमात्र ठरणार आहेस हे लक्षात घे. इथपर्यंतचे तत्वज्ञान श्लोक क्रमांक अठरा ते तीस पर्यंत आपण पाहिले.

Advertisement

पुढील एकतीस ते अडतीस ह्या श्लोकात ते स्वधर्माचे महत्त्व समजावून सांगत आहेत. ते म्हणतात, अखंड चालू असलेले जन्म आणि मृत्यू हे चक्र भेदायचे असेल तर देहाच्या बंधनातून आत्मा मुक्त व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने स्वधर्म निभावला पाहिजे. श्लोक क्रमांक एकतीस ते अडतीस मध्ये स्वधर्म का निभावयाचा त्या बद्दल ते बोलत आहेत. ते म्हणाले मी प्रत्येकाला कर्तव्य नेमून दिलेले असते परंतु मनुष्य स्वत:चे डोके चालवून वेगळेच काहीतरी करत बसतो आणि कुणीतरी त्याला कर्तव्याची जाणीव करून दिलीच तर त्याकडे दुर्लक्ष करतो. तू क्षत्रिय असल्याने ह्या दुष्ट, पापी कौरवांचा नाश करणे हे तुझे कर्तव्य आहे. गीतेत भगवंत कर्तव्यालाच स्वधर्म असे संबोधतात. अर्जुनाला म्हणतात की, तू स्वधर्माच्या पालनाची वेळ आल्यावर भावनेच्या आहारी जाऊन डगमगायला लागला आहेस. हे बरोबर नाही. जो मनुष्य स्वधर्म निभावतो म्हणजे त्याला मी दिलेले काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला मृत्यू नंतर स्वर्गप्राप्ती होते. भगवंतांचे हे सांगणे लक्षात घेऊन आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत आपले कर्तव्य कोणते ते कोणत्याही दडपणाच्या आहारी न जाता निभावायला तयार असायला हवे. मग ते दडपण अपयशाचे असो, भावनेचे असो किंवा नुकसानीचे असो. जो मनुष्य आपले कर्तव्य ओळखेल आणि ते पार पाडण्याचे कर्तव्य करेल त्याला स्वर्गप्राप्ती निश्चितच होईल. कर्तव्य पार पडताना त्याच्या हातून एखादा गुन्हा जरी घडला तरी त्याचे पाप त्याला लागत नाही. पण असे न करता त्याने जर कर्तव्याकडे पाठ फिरवली तर मात्र त्याचे पाप त्याला लागेल आणि पुढील जन्मात त्याला ते भोगायला लागेल हे निश्चित आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.