चौथ्या टप्प्यात चुरस अधिक वाढणार
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा येत्या सोमवारी आहे. या टप्प्यात 10 राज्यांमधील 96 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या टप्प्याचा उघड प्रचार आज शनिवारी संध्याकाळी 5 वाजता संपत आहे. या टप्प्यातही अनेक महनीयांचे भवितव्य पणाला लागेल. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्या दृष्टीने हा टप्पा निर्णायक ठरु शकतो. या टप्प्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील सर्व जागांवर मतदान होईल. त्यामुळे या दोन राज्यांमधील मतदान प्रक्रिया संपणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये वर्चस्व राहिले होते. 2019 ची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक यांच्यातील महत्वाचे अंतर असे की, गेल्यावेळी आंध्र प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि तेलगु देशम यांची युती तुटली होती. तसेच भारतीय जनता पक्षाला आंध्र प्रदेशात एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी ही युती झाली असल्याने या पक्षाला आंध्रमध्ये खाते उघडण्याची संधी मिळू शकते. तेलंगणात या पक्षाला गेल्यावेळी चार जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच खरी स्पर्धा होईल, असे वातावरण आहे. एकंदरीत, यावेळीही मागच्या टप्प्यांप्रमाणे राजकीय विश्लेषकांमध्ये उत्सुकता असून हा टप्पा कदाचित या निवडणुकीचा अंतिम परिणाम निर्धारित करण्यासाठी कारणीभूत होईल. त्याचा हा संक्षिप्त आढावा...
मागच्या निवडणुकीत काय घडले...
? या टप्प्यातील 96 जागांपैकी मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 42 जागांवर विजय मिळविला होता. त्यांच्यामध्ये तेलंगणात 17 पैकी 4, बिहारमध्ये 5 पैकी 4, मध्यप्रदेशात 8 पैकी 8, महाराष्ट्रात 11 पैकी 6, ओडीशामध्ये 4 पैकी 2, उत्तर प्रदेशात 13 पैकी 11, पश्चिम बंगालमध्ये 8 पैकी 5 आणि झारखंडमधील 4 पैकी 3 जागांचा समावेश असल्याचे दिसून येते.
? या टप्प्यात काँग्रेसला तेलंगणात 1, आंध्र प्रदेशात 1, पश्चिम बंगालमध्ये 1 आणि झारखंडमध्ये 1 आणि तेलंगणात 2 अशा 6 जागा मिळाल्या होत्या. वायएसआर काँग्रेसला आंध्र प्रदेशात 25 पैकी 22 जागा प्राप्त झाल्या होत्या. तर तेलगु देशमला याच राज्यात 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. समाजवादी पक्षालाही उत्तर प्रदेशमध्ये 2 तर राष्ट्रवादीला महाराष्ट्रात 2 जागा होत्या.
कोणासाठी काय...
भारतीय जनता पक्ष
? या टप्प्यात भारतीय जनता पक्षासमोर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार आणि महाराष्ट्र येथील मागच्या वेळी मिळविलेल्या जागा टिकवून धरण्याचे आणि शक्यतोवर वाढविण्याचे आव्हान आहे. आंध्र प्रदेशात यंदा हा पक्ष तेलगु देशमशी युती करुन 6 जागांवर स्पर्धेत आहे. त्यांच्यापैकी तीन जागांवर या पक्षाला अपेक्षा आहेत. तेलगु देशमलाही काही मतदारसंघांमध्ये लाभ होऊ शकतो.
काँग्रेस
? तेलंगणा हे काँग्रेससाठी महत्वाचे राज्य आहे. तेथे या पक्षाची सत्ता आल्याने लोकसभेच्याही अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, गेल्यावेळी ज्या राज्यांमध्ये पूर्ण पराभव झाला होता, तेथे यंदा कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान या पक्षासमोर आहे. तेलगु देशम या पक्षाला आंध्र प्रदेशात दोन अंकी जागा मिळविण्याचे आव्हान स्वीकारायचे आहे. बीआरएससाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे.