For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निर्णायक टप्प्यात...

06:09 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
निर्णायक टप्प्यात
Advertisement

लोकसभा निवडणुकीतील सहावा टप्पा शनिवारी पार पडत असून, मतटक्का कसा राहणार, याकडे देशाचे लक्ष असेल. या टप्प्यात 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे. यात राजधानी दिल्लीतील सर्वच्या सर्व 7 तसेच हरियाणातील 10 जागांचाही समावेश राहणार आहे. त्यामुळे अनेकार्थांनी ही निवडणूक महत्त्वाची असेल. दिल्लीत आपचे सरकार आहे. मात्र, लोकसभेत भाजपाचे वर्चस्व दिसून येते. आप व भाजपातील संघर्ष तसा नवीन नाही. मात्र, मागच्या काही दिवसांत तो अगदी टीपेला पोहोचला आहे. मद्यघोटाळाप्रकरणी आपच्या अनेक नेत्यांना अटक झाली आहे. तर अरविंद केजरीवाल हे याप्रकरणात जामीनावर असून, तुऊंगातून बाहेर आल्यापासून त्यांनी भाजपाविरोधात रान उठविले आहे. तथापि, आपच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणीमुळे भाजपाच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. केजरीवाल यांचे सचिव विभवकुमार यांना याप्रकरणी अटकही करण्यात आली आहे. त्याचबरोबर मारहाण होत असताना केजरीवाल हे घरातच होते, असा आरोप मालिवाल यांनी केला आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणीत अधिकच वाढ झालेली दिसून येते. दिल्ली, हरियाणा पट्ट्यात केजरीवाल यांना मानणारा वर्ग आहे. शिक्षण, आरोग्यासारख्या क्षेत्रात केजरीवाल यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे, अशी या वर्गाची भावना आहे. त्यामुळे अटकेनंतरही केजरीवाल यांच्याबद्दल काही प्रमाणात सहानुभूती टिकून होती. आता मालिवाल प्रकरणामुळे त्यावर नकारात्मक परिणाम होणार का, हे पहावे लागेल. दिल्ली, हरियाणात आप व काँग्रेस हातात हात घालून पुढे जात आहेत. एरवी दिल्लीतील भाजपाचे आव्हान मोडून काढणे, ही सोपी गोष्ट नव्हे. मात्र, आप व काँग्रेसच्या मतैक्यातून 7 पैकी काही जागांवर यश मिळविण्याची आस हे दोन्ही पक्ष बाळगून आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हरियाणात भाजपाबद्दल एक सार्वत्रिक नाराजी दिसते. त्यामुळे मागील विजयाची पुनरावृत्ती करणे पुन्हा शक्य होईल काय, याबाबत साशंकता वाटते. उत्तर प्रदेशमधील जनता मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच्या पाठीशी मजबूतपणे उभी राहिली होती. 2014 मध्ये पक्षाने 72, तर 2019 मध्ये 65 जागा मिळविल्या होत्या. एकूण 80 जागा असणाऱ्या यूपीतील 14 जागांसाठी आज मतदान होत आहे. वास्तविक, या खेपेला राहुल गांधी व सपाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपाला आव्हान देण्याचा जरूर प्रयत्न केला आहे. पण, योगी आदित्यनाथ यांची भक्कम तटबंदी तोडणे त्यांना शक्य होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसा मागच्या काही दिवसांत या दोन्ही नेत्यांच्या सभांनाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. काही मतदारसंघातील निवडणुका भाजपाला जड गेल्या. हे पाहता खरोखरच यूपीतील काही निकाल धक्कादायक लागणार का, याचे उत्तर मिळण्यासाठी 4 जूनपर्यंत थांबावे लागेल. पश्चिम बंगाल हेही भाजपाच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य होय. तेथे अलीकडे भाजपाने आपला प्रभाव वाढविला आहे. संदेशखालीसारख्या प्रकरणांतून तृणमूलला कोंडीत पकडण्याची संधी मोदी व शहा यांनी दवडलेली नाही. त्यामुळे तेथून पक्षाला चांगल्या जागांची अपेक्षा असेल. याशिवाय ओडिशातील 6, बिहारमधील 8 आणि झारखंडमधील 4 जागाही महत्त्वाच्या असतील. मात्र, यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी भाजपाचा कस लागला आहे, हे नक्की. ओडिशातील भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान, बिहारमध्ये तेजस्वी यादव व काँग्रेसने उभे केलेले आव्हान तर झारखंडमध्ये सोरेन यांच्यावरील कारवाई या साऱ्याचा निवडणुकीवर बरावाईट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याशिवाय जम्मू काश्मीरमधील अनंतनाग राजौरी मतदारसंघातील निवडणूकही लक्षवेधक राहील. यानंतर केवळ एकच टप्पा शिल्लक असेल. हे बघता अर्धी अधिक निवडणूकप्रक्रिया आता पार पडली, असे म्हणता येईल. भाजपाचे नेते अमित शहा यांनी पाचव्या टप्प्यातच आम्ही टार्गेट पूर्ण केल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी भाजपाला 300 हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, योगेंद्र यादव यांनी त्यांचा दावा खोडून काढत हा आकडा 240 ते 260 पर्यंत सीमित राहणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे करण थापर यांनी किशोर यांची घेतलेली मुलाखतही चर्चेचा विषय ठरली आहे. हिमाचल प्रदेश निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा अंदाज चुकला होता. थापर यांनी त्याकडे लक्ष वेधल्यावर किशोर यांनी हा दावा फेटाळत संताप व्यक्त केला. त्यानंतर यासंदर्भातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करीत त्यावरून त्यांना ट्रोलही केले गेले. परंतु, मी काय म्हणतो ते 4 जूनलाच कळेल, असे किशोर यांनी म्हटले आहे. शेवटी अंदाज हे अंदाजच असतात. नेमके काय होणार, हे कळण्यासाठी 4 जूनच उजडावा लागेल. 2004 च्या निवडणुकीत देशात फील गुड पॅक्टर असल्याचे सांगण्यात आले. परंतु, इंडिया शायनिंगचा नारा निकालानंतर कुठल्या कुठे विरला. आता तशी स्थिती दिसत नाही. 2014 किंवा 2019 प्रमाणे लाट दिसत नसली, तरी सरकार जाईल, असेही वातावरण नाही. भारतीय शेअर बाजारही उसळता आहे. निवडणूक काळात मार्केटमध्ये चढ उतार असतातच. यंदाही सेन्सेक्सचा आलेख कमी जास्त होत असल्याचे पहायला मिळत होते. मात्र, ही सारी मरगळ झटकत मुंबई शेअर बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये गुऊवारी तब्बल 1100 अंकांची मोठी वाढ पहायला मिळाली. त्यामुळे निर्देशांक 75 हजार 407.39 अंक इतक्या सर्वौच्च स्थानावर पोहोचला. तर एनएसई निफ्टीमध्येही 350 अंकांची तेजी दिसून आली. त्यामुळे निफ्टीच्या निर्देशांकानेही 22 हजार 959.70 असा विक्रमी टप्पा गाठला. निकालाला अवघे दहा दिवस उरलेले असताना असा विक्रम होणे म्हणजे भाजपासाठी शुभसंकेत तर नाहीत ना, याचेही औत्सुक्य असेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.