कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात...
नवीन वर्षाची नवीन पहाट उगवताना प्रत्येक नव्या वर्षी भविष्यात काय मांडून ठेवले आहे याची एक हुरहुर प्रत्येकालाच असते. पूर्व आयुष्यात घडून गेलेल्या बऱ्या-वाईट घटनांचा परिणाम भविष्यात सुद्धा होणार असतो. मात्र त्याचवेळी आजच्यापेक्षा उद्याचा चांगला दिवस उगवेल आणि आपले जीवन अधिक समृद्ध होईल ही आशा माणसाला पुढे पुढे नेत असते. या आशेवरच जग चालले आहे आणि त्यामुळेच रोजचा दिवस नवे वर्ष जन्माला घालत असला तरी, एक जानेवारी या तारखेला जगभरात नव्या वर्षाची तारीख म्हणून मोठे महत्त्व आहे. 2025 म्हणजे नव्या सहस्त्रकातील पहिले पावशतक! एक मोठा पल्ला या दोन तपात जगाने गाठला आहे. 21 वे शतक हे संगणक युग असेल असे खूप आधीपासून सांगितले जायचे. ते जाणून घेतच आजची पिढी मोठी झाली. औद्योगिक क्रांतीपासून जगाने गती घेतली असे सांगितले जात असले तरी त्याचा परिणाम भोगलेल्या भारताची प्रगती स्वातंत्र्याच्या वर्षापासून जरी विचारात घेतली तर एक मोठा पल्ला पार करून भारतीय यशस्वीरित्या नव्या युगाच्या नव्या आव्हानांबरोबर स्वत:ला जुळवून घेत यशाच्या दिशेने धावू लागलेले आपल्याला दिसतात. या काळात टेलिफोन पासून दळणवळणासाठी उपयुक्त वाहनांपर्यंत आणि प्रत्येक गोष्टीतील तंत्रज्ञानापर्यंत खूप मोठा बदल घडत आला आहे. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर जीवन अधिक सुसह्य होण्याचे अनुभव यापूर्वी आले आणि आता तर एका गतिमान युगात हे अनुभव रोज नव्याने अद्ययावत होत आहेत. गेल्या काही वर्षात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने भारताला गतिमान करण्यास सुरुवात केली. त्याच्या बरोबरीनेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र हळूहळू आपला प्रभाव दाखवायला लागले आहे. यंदाच्या वर्षात या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राचा शिरकाव अनेक क्षेत्रांमध्ये झालेला दिसून आल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. अर्थातच संगणकाचे युग सुरू झाले त्यावेळी सुद्धा संगणकाचा परिणाम लोकांच्या रोजगारावर होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. संगणकाची गती आणि गणन प्रक्रिया पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. हा संगणक कोणत्या कोणत्या क्षेत्रात बदल घडवेल याची तेव्हा बहुतांश लोकांना कल्पना नव्हती. आजही संगणक आपले नवे नवे रूप दाखवत नवनव्या क्षेत्रात प्रगती करत आहे. मात्र, संगणकामुळे तात्कालीक बेरोजगारीचे आव्हान काही टिकले नाही. संगणक चालवण्यास माणूस लागतो आणि संगणकाचा वापर करणाऱ्यांचे कष्ट कमी होऊन नवे बरेच शिकण्याची संधी मिळाली हा यापूर्वीचा अनुभव आहे. मात्र आजही कष्टाची कामे आणि जीव धोक्यात घालून केली जाणारी कामे यासाठी मनुष्यबळच वापरले जाते. तंत्रज्ञान विकसित झाले असले तरीसुद्धा ते परवडण्यासारखे नसल्याने बहुतांश ठिकाणी मानवी श्रमालाच महत्त्व द्यावे लागते. परिणामी श्रमिकांना आजही श्रमिक म्हणून काम उपलब्ध आहे. अर्थात श्रमिकांचे जीवन सुसह्य होणे आणि त्यांना आजच्या साक्षर जगात त्यांच्या क्षमतेप्रमाणे अधिक चांगले काम उपलब्ध होऊन त्यांची कष्टातून मुक्तता होणे आवश्यक आहे. अशावेळी मानवी जीवन महत्त्वाचे म्हणून तेवढ्याच खर्चात यंत्राच्या सहाय्याने कष्टाची कामे करणे शक्य व्हावे यासाठी खूप गतीने संशोधन सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या कामी खूप काही करू शकते असे जगभरातील तंत्रज्ञांना वाटते. अर्थातच मानवी जीवन धोक्यात घालणाऱ्या अनेक ठिकाणी त्या जीवनाचे मोल लक्षात घेऊन तंत्रज्ञांनी अनेक प्रयोग केले आणि ते यशस्वीही करून दाखवले आहेत. मात्र त्याची क्षेत्रे मर्यादित आहेत. त्यांचा वापरही मर्यादित ठिकाणीच होत आहे. त्यामुळे तातडीने खूप बदल होईल असे वाटत नाही. तरी तंत्रज्ञानातील बदल ज्या गतीने होत आहेत त्यानुसार अनेक क्षेत्रे व्यापली जातील हे निश्चित आहे. त्यासाठी काही खूप काळ लागणार नाही. मात्र, वाढत्या लोकसंख्येचे काय? त्यांना काम कुठले मिळणार? असा प्रश्न समाजाला नेहमीच पडत आला आहे. तो यापुढेही पडत राहील मात्र कौशल्यांचा स्वीकार करून मानव प्रत्येक काळात स्वत:साठी उपजीविकेची व्यवस्था करत आलेला आहे. त्यामुळे क्षेत्र बदलले तरी त्याचे उपजीविकेचे साधन हिरावले जाईल असे मानण्याचे कारण नाही. त्यासाठी या बदलांना स्वीकारणे ही काळाची गरज बनणार आहे. तो काळ 2025 च्या रूपाने उगवला आहे. हा काळ पुन्हा एकदा मानवाला त्याच्या कार्य कौशल्यात सुधारणा करण्यास सुचवतो आहे. एखाद्या पिढीच्या आयुष्यात बदलाचा हा दुसरा किंवा तिसरा टप्पा ही असू शकतो. बदलाचा हा वेग मतीगुंग करणारा असला तरी कल्पनेच्या पलीकडचा नाही हेही तितकेच सत्य. अनेक कल्पना सत्यात उतरवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या जे चमत्कार दाखवत आहे त्यावरून ही यंत्रणा यंदाच्या वर्षात सुद्धा आपली बाल्यावस्था दूर करेल अशी शक्यता दिसत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र दिवसेंदिवस विकसित होत चालले आहे हे निश्चित. विविध प्रकारच्या संगणक प्रणालींद्वारे चित्रांपासून ते विचार व्यक्त करण्यापर्यंत, चालक विरहित वाहन चालवण्यापासून रुग्णाच्या उपचारासाठी डॉक्टरला सहकार्य आणि शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यापर्यंत अनेक क्षेत्रातील कार्यात कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी ठरत आहे. अचूकतेचा आग्रह धरणारे हे क्षेत्र स्वत: बरेच काही घडवत असले तरी माहितीच्या महासागरातून उपयुक्त मोती शोधून काढायचा तर मानवी मेंदूची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. मानवाच्या मेंदूला मदतनीस म्हणून ही यंत्रणा नजीकच्या काळात कार्यरत राहील. कधीतरी ही मानवावर मात करेल अशी भीती जगात दाखवली जात आहे. मात्र, ही भीती आहे त्याच पद्धतीने त्याला रोखण्यासाठी मानवी मेंदूही कार्यरत राहणार आहे.अशा आव्हानांना पेलतच मानवी जीवन विकसित होत आले. ते यंदाच्या वर्षातही अधिक विकसित होवो आणि सर्व आव्हानांवर मात करण्याची आपली उपजत उर्मी या युगातील प्रत्येक मानवात जागृत राहो याच नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!