Solapur : सोलापुरात रेल्वेच्या चाकांवर आता 'सीसीटीव्हीची नजर' !
सोलापूर रेल्वे प्रवास होणार अधिक सुरक्षित
सोलापूर : सोलापूरमधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखीन सुरक्षित होणार आहे. स्थानकावरील आठ हटमध्ये प्रत्येकी दोन असे १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या माध्यमातून रेल्वेच्या चाकांपासून ते ब्रेक सिस्टीमपर्यंत प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्हीमधून बारकाईने लक्ष असणार आहे.
रेल्वे गाडी स्थानकात येताना किंवा बाहेर जाताना हटमध्ये बसलेले कर्मचारी या कॅमेऱ्यांद्वारे गाडीच्या खालील भागावर सतत नजर ठेवतात. चाकांमध्ये काही तुटलेले पार्ट, ब्रेक बाइंडिंग, हँगिंग पार्ट किंवा डॉट एक्सेलमुळे निर्माण होणारी आग' अशा घटकांवर तत्काळ लक्ष जाण्याची सोय या कॅमेऱ्यांमुळे झाली आहे. यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, आधुनिक आणि विश्वासार्ह होणार आहे.
कॅमेरे बसविल्याने आपत्कालीन परिस्थिती वेळेवर समजणार
सोलापूर रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जातात. सोलापूर रेल्वे स्थानकात आठ ठिकाणी असणाऱ्या हटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती वेळेवर समजणार आहे. तसेच कर्मचारी आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास नियंत्रण रेल्वे गाड्यांवर लक्ष असेल. यामुळे संभाव्य होणारे अपघात यामुळे टळतील. - योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर
अपघात रोखण्यासाठी 'थर्मामीटर गन' चा वापर
यासोबतच हटमध्ये तैनात कर्मचाऱ्यांना 'थर्मामीटर गन' देण्यात आली आहे. या उपकरणाद्वारे ते रेल्वेच्या अॅक्सल बॉक्सचे तापमान मोजतात, ज्यामुळे चाकांमध्ये असामान्य उष्णता निर्माण होत असल्यास ती त्वरित ओळखता येते. ही अगोदरच दिलेली चेतावणी असल्याने मोठ्या दुर्घटना टाळता येण्यास मदत होणार आहे.
गंभीर घटनांचे चित्रीकरण ठरणार महत्त्वाचा पुरावा
रेल्वे प्रवासादरम्यान जर कुठली गंभीर घटना जसे की, हॉट एक्सेलमुळे लागलेली आग, ब्रेक बिघाड, किंवा चाकांमध्ये ठिणग्या पडल्या, तर त्याचे चित्रीकरण या सीसीटीव्ही कॅग्रेयांत टिपले जाईल. हे फुटेज पुढील चौकशीत महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरले जाणार आहे. रेल्वेच्या प्रत्येक फेरीत सुरक्षेचा दर्जा वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरतोय, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.