Solapur : सोलापुरात झेडपीच्या स्वच्छ भारत मिशन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
ऑक्टोबर महिन्याचे वेतन रखडले
सोलापूर : ऑक्टोबर महिन्याचे वेतन रखडल्याने शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध करण्यात आलेला नाही. माहे ऑक्टोबरचे वेतन अद्याप प्रलंबित आहे. या विभागाला गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय खर्चासाठी निधी नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे, यासाठी शासनाकडे लेखी निवेदन देऊनही होत नाही. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्य स्तरावर निधी उपलब्ध असूनही वेतनासाठी निधी मिळत नाही.
एसएनए स्पर्श प्रणालीद्वारे दिला जाणारा निधी जमा होण्यास २० दिवसापेक्षा अधिकचा कालावधी लागतो. या सर्व बाबींचा विचार करता गुरुवार, २७नोव्हेंबर रोजी निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम करण्याचा संघटनेच्या वतीने घेण्यात आला होता. आगामी काळात कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत न झाल्यास १ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमांकात जाधव व कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.