Solapur : सोलापुरात मनपाचे 4 सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा सेवेत !
सोलापूर महापालिकेत सहा महिन्यांसाठी करार पद्धतीवर पुनर्नियुक्ती
सोलापूर : महापालिकेत विविध विभागात सेवानिवृत्त चार अधिकाऱ्यांना करार पद्धतीने पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. यामध्ये सेवानिवृत्त उपअभियंता सिद्रामप्पा उस्तुरगे, सेवानिवृत्त भूमी व अभिलेख उपअधीक्षक सिद्राम तुपदोळकर, सेवानिवृत्त अतिक्रमण प्रतिबंधक विभाग अधिकारी जगन्नाथ बनसोडे आणि सेवानिवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी सय्यद मननाण यांचा समावेश आहे. या चारही अधिकाऱ्यांनी गुरुवारी महापालिकेत नियुक्त केलेल्या विभागामध्ये पदभार घेतला आहे.
शासकीय, निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित (विशिष्ट) कामासाठी घेण्यासंदर्भातील महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार मनपाकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. या संदर्भात संबंधितांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी या चारजणांची निवड करण्यात आली. शासन निर्णयास अनुसरून कामकाजासाठी पॅनेल तयार करण्यात आले आहे. पॅनेलमधील निवड दिलेल्या या अधिकाऱ्यांनी अटी व शर्तीस अधीन राहून कामकाज करावयाचे आहे. नियुक्ती संदर्भात मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदेश काढले आहेत. त्यांची सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांची अतिक्रमण विभागाकडे अतिक्रमण प्रतिबंध अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सेवानिवृत्त भूमी व अभिलेख उपअधीक्षक सिद्राम तूपदोळकर यांची नगररचना विभाग व भूमी व मालमत्ता विभागाकडे नियुक्ती केली आहे. सेवानिवृत्त उपअभियंता सिद्रामप्पा उस्तुरगे यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील शहर पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने कामकाज पाहण्यासाठी नियुक्ती करण्यात येत आहे.
त्यांना सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि आयुक्त यांच्या निर्देशानुसार पाणी पुरवठाबाबत कामकाज पाहावे लागणार आहे तर सेवानिवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी सय्यद मननाण यांची मुख्यलेखापाल विभागाकडे नियुक्ती केली आहे. त्यांनी मुख्यलेखापाल विभागाकडे शासनाकडून प्राप्त होणारे सर्व विभागाचे लेखापरिक्षण आक्षेपाच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून अहवाल प्राप्त करून ती आक्षेप वगळणेकामी लेखापरिक्षण समितीकडे सादर करणे तसेच लेखापरिक्षणच्या अनुषंगाने सर्व कामकाज पहावयाचे आहे.