Sangli Crime : सांगलीत सराईत गुन्हेगारांची पोलीस अधीक्षकाकडून झाडाझडती
दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईतांवर पोलिसांची धडक कारवाई
सांगली : पोलीस ठाण्यामध्ये मागील पाच वर्षात दोन किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत ३०६ गुन्हेगारांची बुधवारी झाडाझडती घेण्यात आली. पुन्हा कोणत्या गुन्ह्यात आढळला तर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संबंधिताना दिला.
सराईतांच्या यादीवरील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असलाच पाहिजे त्याचबरोबर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय परिसरात गुन्हेगारांचे आदान-प्रदान कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस ठाण्यात मागील पाच वर्षात दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार, मोक्कामध्ये जामिनावर सुटलेले, हद्दपारीचा कालावधी संपलेले गुन्हेगार, अंमली पदार्थ आणि शस्त्र बाळगल्याबद्दल गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.
पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगारांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली. त्यांच्याकडून माहितीचा फॉर्म भरून घेतला. सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजीविकेचे साधन काय, मित्र कोण आहेत, ते कोठे आणि काय काम करतात, त्यांचा संपर्क, नातेवाइकांचा संपर्क क्रमांक आणि इतर माहिती अद्यावत करण्यात आली.
पोलिस अधीक्षक घुगे यांनी यावेळी आदान-प्रदान कार्यक्रमास भेट दिली. आरोपींनी भविष्यात कोणताही गुन्हा करू नये, गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेऊ नये, याबाबत कडक शब्दात सज्जड दम दिला. शस्त्रतस्करी किंवा खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात पुन्हा सहभाग आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला. सध्या जामिनावर असलेल्यांवर गुन्हे प्रकटीकरण पथक, बीट मार्शल यांनी सतत लक्ष ठेवावे. त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा आहे की नाही, याची पडताळणी करावी.