वयाच्या 104 व्या वर्षी कारागृहात
सध्या अमेरिकेतील एका घटनेची मोठी चर्चा होत आहे. न्यूयॉर्क प्रांतातील लिव्हिंग्स्टन काऊंटीत वास्तव्य करणाऱ्या एका 104 वर्षे वयाच्या वृद्ध महिलेस अचानक कारागृहात नेण्यात आले. इतकी वृद्ध असणाऱ्या या महिलेने असा गुन्हा तरी कोणता केला होता, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. तिला कारागृहात नेण्यात आले ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि तिच्या कुटुंबियांना अनेकांचे फोन, संदेश इत्यादी येण्यास प्रारंभ झाला. ही घटना ज्ञात झालेल्या सर्वांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. तिच्या कारागृहवारीचे कारण नंतर स्पष्ट झाले. हे कारण समजताच लोकांच्या आश्चर्याचा कडेलोट होण्याचे तेवढे राहिले होते.
या महिलेचे नाव लोरेटा असे आहे. ही कारागृहयात्रा तिला तिच्या 104 व्या जन्मदिनीच घडली, हा लोकांना आणखी एक धक्का होता. अखेर स्वत: लोरेटा बाईंनीच या घटनेचा खुलासा केला, तेव्हा तिच्या परिचितांना हायसे वाटले. पण बाईंचे स्पष्टीरकरणही या घटनेइतकेच आश्चर्यकारक होते. या बाईंचा 104 वा जन्मदिन साजरा केला जात होता. त्यांना त्यांच्या मनातील इच्छा (बर्थडे विश) विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी कारागृह पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तशी माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी त्वरित, त्याच दिवशी लोरेटा यांना कारागृह दाखविण्याची व्यवस्था केली. त्यांना कारागृहात घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी वाहन पाठविले. आसपासच्या लोकांनी त्यांना पोलिसांच्या वाहनात बसताना पाहिले. कोणीतही या प्रसंगाचे छायाचित्र सोशल मिडियावर प्रसारित केले. तथापि, पोलिसांनी तिला कारागृहात का नेले, हे कारण मात्र गुप्त राहिले होते. त्यामुळेच या महिलेच्या परिचितांना चिंता वाटू लागली होती. अखेर लोरेटा बाईंनी आपल्या ‘कारावासा’चे रहस्य उलगडले. ही कारागृह यात्रा त्यांना कोणताही गुन्हा केल्याने घडली नव्हती, तर त्यांच्या स्वत:च्या इच्छेनुसार होती.
लोरेटा बाईंना केवळ कारागृह पहायचे नव्हते, तर काही काळ तेथे कैद्यांसारखे वास्तव्य करुन तो अनुभव घ्यायचा होता. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच कारागृह आतून पाहिले नव्हते. ते पाहण्याची आणि तेथे काहीकाळ वास्तव्य करण्याची त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्यांचे वय पाहता ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी ती इच्छा व्यक्त करताक्षणीच पुढच्या हालचाली केल्या गेल्या. त्यांना नजीकच्या कारागृहात नेण्यात आले. तेथे कैद्यांच्या एका कक्षात त्यांना काहीकाळ ठेवण्यात आले आणि नंतर पुन्हा घरी नेण्यात आले. अशा प्रकारे त्यांची इच्छापूर्ती झाली.