For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई-ठाणेच्या तहात भाजप-शिवेसेनेत रस्सीखेच !

06:38 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबई ठाणेच्या तहात भाजप शिवेसेनेत रस्सीखेच
Advertisement

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुऊवात झाली आहे. महायुती आणि महाआघाडीत जागावाटपावऊन अद्याप धुसफुस सुऊ आहे. 8 मार्चला भाजप दुसरी यादी प्रसिद्ध करणार होती. मात्र या धुसफुसीमुळे जागावाटप लांबणीवर गेले. तर हीच परिस्थिती महाआघाडीत आहे.

Advertisement

उद्धव ठाकरे यानी अमोल किर्तीकरच्या नावाची उत्तर पश्चिममधून उमेदवार म्हणून घोषणा करताच काँग्रेस पक्षात नाराजीनाट्या सुऊ झाले आहे. यामुळे आठवड्याच्या शेवटी राज्यातील महत्त्वाच्या पक्षांची उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपच्या दृष्टीने जसे राज्यातील 48 लोकसभा मतदार संघ महत्त्वाचे मानले जातात, तसेच शिवसेनेच्या दृष्टीने नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई आणि ठाण्यातील वर्चस्व हे शिवसेनेबरोबरच सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. शिंदे जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी ते ज्या जिह्यातून येतात त्या ठाणे जिह्यातूनच शिंदेंचे वर्चस्व कमी करण्याचा घाटच जणू भाजपने घातला असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चांवऊन दिसते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी जसे मुंबई आणि ठाण्यावर आपले वर्चस्व ठेवले तसे शिंदे जागा वाटपात ठेवणार का? उध्दव ठाकरें सोबतच्या लढाईत जिंकलेले शिंदे जागावाटपाच्या तहात भाजपसोबतही जिंकणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.त

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेने मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश कऊन आपली पाळे-मुळे घट्ट केली. पालिकेच्या राजकारणानंतर थेट राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नावर लढत हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूका जिंकता येतात हे देखील 1987 साली झालेल्या विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखविले. कालांतराने भाजपने शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर थेट राज्यात आणि केंद्रातही शिवसेना सत्तेत आली. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर कधी नव्हे ती शिवसेनेची आज दोन शकले झाली आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची धामधुम सुरू आहे. मुंबई आणि ठाणे जिह्यांचा विचार करता मुंबईत 6 तर ठाणे आणि पालघर जिह्यात मिळून 4 असे दहा लोकसभा मतदार संघ येतात. 2019 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील 6 जागांपैकी भाजपला 3 तर शिवसेनेला 3 असा फॉर्म्युला होता तर ठाण्यातील 4 जागांपैकी 3 जागा शिवसेनेने घेतल्या होत्या. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील एकूण 10 जागांपैकी 6 जागांवर उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे तर 4 जागांवर भाजपने आपले उमेदवार निवडून आणले होते. उध्दव ठाकरे यांनी भाजपला नेहमीच त्यांच्या मर्यादेत ठेवताना भाजपकडून जागावाटप करताना वेळोवेळी काही मागण्याही मान्य कऊन घेतल्या जसे की 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची अधिसूचना काढा मग पुढील चर्चा कऊ, मात्र देशात नरेंद्र मोदींच्या लाटेनंतर भाजपकडून मित्रपक्षांना योग्य तो सन्मान न देता त्यांना संपविण्याची भाषा होऊ लागली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपसोबत युती असताना उध्दव ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील 10 पैकी 6 जागा घेतल्या होत्या. मात्र आज त्याच शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची बोळवण मुंबई आणि ठाण्यातील प्रत्येकी एका जागेवर करण्यात येत असल्याची चर्चा आहे. मुंबईतील शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे आणि ठाण्यातील कल्याण लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी भाजप सोडेल अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे.

Advertisement

शिवसेनेचे खासदार असलेल्या मुंबईतील गजानन किर्तीकर आणि अरविंद सावंत यांच्या मतदार संघावर भाजप उमेदवार देणार असल्याचे बोलले जात आहे, तर पालघर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित हे भाजपचेच होते. मात्र 2019 ला ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले होते, सध्या पालघर लोकसभा मतदार संघात भाजप आणि ठाकरेच्या सेनेचा एकही आमदार नाही तर शिंदेंच्या सेनेचा एक आमदार तर तीन आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या बविआचे असल्याने हा मतदार संघ कोणाला मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ज्या मुंबई ठाण्यात शिवसेनेने भाजपला डोके वर काढू दिले नाही त्याच मुंबईत आज विधानसभेच्या 36 जागांपैकी भाजपचे 16 तर शिवसेनेचे 14 आणि ठाणे आणि पालघर जिह्यातील 24 विधानसभा जागांपैकी भाजपच्या 9 तर शिवसेनेच्या 6 जागा आहेत. उध्दव ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी भाजपने सेनेचे उमेदवार असलेल्या ठिकाणी बंडखोर उभे केल्याचे सांगत, भाजपने युती धर्म पाळला नसल्याची टीका केली. भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी बंद दाराआड उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेले वचन आणि विधानसभा निकाल लागल्यानंतर ठाकरे यांनी भाजपला शह देत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. आता शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी शहा यांच्याबाबत ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारात पुन्हा शहा आणि ठाकरे यांच्या बंद दाराआडचा एपिसोड गाजण्याची शक्यता आहे.

ज्या मुंबई आणि ठाण्यात बाळासाहेबांनंतर उध्दव ठाकरे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते. त्याच शिवसेनेला आज दक्षिण मुंबईची हक्काची जागा असो की गजानन किर्तीकर खासदार असलेल्या उत्तर पश्चिमची जागा, या जागा भाजपच लढणार असल्याची चर्चा आहे तर ज्या ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिनिधीत्व करतात त्या ठाणे लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्र्यांचे समर्थक रवींद्र फाटक इच्छुक असताना भाजपकडून तेथे अचानक विनय सहस्त्रबुध्दे आणि गणेश नाईक यांचे नाव समोर येते. म्हणजेच शिंदेंचे ठाण्यातील महत्त्व कमी कऊन उलट राज्यात सत्ताबदलानंतर शिवसेनेच्या जागा कमी असताना आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले असे सतत भाजपकडून सांगितले जात आहे. तरी भाजपने शिवसेनेला संपविण्यासाठीच शिंदेंचा प्यादा म्हणून वापर केला, आता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खरी कसोटी लागणार असून उध्दव ठाकरेंसोबतच्या युध्दात जिंकलेले शिंदे भाजपसोबत जागा वाटपाच्या तहात जिंकणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.