For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्रातही ‘जिने की दुआ, मरने की दवा’

06:54 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्रातही ‘जिने की दुआ  मरने की दवा’
Advertisement

‘वह दुआ देते है जीने की लेकीन दवा देते हैं मरने की’ हे नितीश कुमार यांचे वाक्य! जेव्हा त्यांनी भाजपची पहिल्यांदा साथ सोडली आणि लालू प्रसाद यादव यांचा हात धरला... तेव्हा भाजपच्या राजकारणावर त्यांचे हे वक्तव्य होते. अर्थात नंतर दोनदा त्यांनी ही ‘दवा’ घेतली. पण, सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात असे घडत असेल तर काही उच्चपदस्थ नेत्यांच्या मनात याहून वेगळी भावना असणार नाही

Advertisement

.इचलकरंजीतील भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार आणि ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. अर्थातच सहकार, शिक्षण, टेक्स्टाईल क्षेत्रात वर्चस्व असलेल्या आवाडेंच्या घरातही दीर्घकाळ खासदारकी होती. पण आता हा मतदार संघ शिंदे सेनेच्या खासदार धैर्यशील माने यांना देण्याचे निश्चित झाले असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार असताना आवाडे यांच्यासारखा ज्येष्ठ नेता बंडाची भाषा बोलतो. तेव्हा हे बंड सत्तापक्षाच्या इशाऱ्यावर झाले नाही असे धाडसाने म्हणता येत नाही. आधीच धैर्यशील माने यांची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडी जंग जंग पछाडत असताना आणि राजू शेट्टी यांनाही लोकसभेत जाऊ द्यायचे नाही असे सर्व कारखानदार ठरवत असताना आवाडे यांनी लढण्याची घोषणा करणे सहज घडलेले नाही.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उध्दव ठाकरे यांनी भाजपपासून काडीमोड घेतला आणि महाविकास आघाडीची घोषणा केली. याचे एक कारण, ठाकरेंचे अनेक उमेदवार पराभूत होण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या घडामोडींचा होता. अर्थात त्यावर खुलासेवार चर्चा अद्याप झालेली नाही. कारण ठाकरेंच्या त्या सत्तेत त्यापैकी काही कार्यरत होते. एकनाथ शिंदे, अजित पवार एकाच तंबूत आल्याने आता त्याची जाहीर वाच्यता त्यांच्यात फूट पडायला होऊ लागेल. पण, पाडापाडीचे हे राजकारण कधीकाळी काँग्रेसचे अंतर्गत वैशिष्ट्या होते. ते आता भाजपचे झाले आहे. प्रचार करावा लागणार नाही म्हणणारे रथातून उतरेनासे झालेत. भाजपमधील अनेक नेत्यांना घरी बसवण्यासाठी सुध्दा असे राजकारण उपयोगात आले आहे. आता त्याचा कळस होण्याची स्थिती असून महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत काय काय चमत्कार पहायला मिळतील याची चूणुक तीन, चार महिने आधी लोकसभेच्या निमित्ताने पहायला मिळू लागली आहे. विशेष करून ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कशी सुरू आहे, ते यापूर्वीच्या वार्तापत्रातही दिसलेले आहेच. आता ठाणे, कल्याण, हिंगोली, संभाजीनगर, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग असे धक्के पचवत नाशिक आणि हातकणंगलेचा कडू घोट शिंदे यांना गळी उतरवावा लागतो की काय? अशी स्थिती दिसत आहे.

Advertisement

माढा लोकसभेचे अधिकृत उमेदवार अडचणीत येत आहेत आणि आता पाणी डोक्यावरून जाते आहे म्हंटल्यावर खास विमानाने तिथली फडणवीस प्रेमी मंडळी नागपूरला रवाना झाली. अजितदादांनीही सतर्क होत रामराजेना निमंत्रण धाडले. मोहिते-पाटील पवारांचे उमेदवार होणार म्हटल्यानंतर ही जी गती घेतली, ती आधी घेतली नाही. मोहिते-पाटील यांच्याकडून आता माघारीची वेळ संपली असा निरोप आल्यावर पडझड रोखायला सुरुवात झाली. हे सुध्दा पाडापाडीचेच राजकारण. अर्थातच माढामध्ये जे होईल त्याचा परिणाम पुढे बारामतीतसुध्दा दिसणार आहे. मेळावा घेऊन शब्द दिलेले हर्षवर्धन पाटील यांनाही शब्द पाळायचे बंधन राहणार नाही. हे फक्त पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे असे नाही. तिकडे अमरावतीत राणा यांना भाजपमध्ये सर्वांचा विरोध डावलून प्रवेश दिला गेला. आडसुळ अडचणीत असल्याने थांबले. पण बच्चू कडू यांनी आपला उमेदवार दिला. तिथे विरोधी उमेदवाराला जितका प्रतिसाद आहे तितकाच कडू यांच्या उमेदवाराला देखील आहे. गेल्या वेळी राणा बाईंचे विजयाचे मार्जिन फारसे नव्हतेच. त्यात रवी राणा आणि बच्चु कडू यांच्यातील वाद कायम पेटता ठेवला गेला. त्याचे परिणाम आता तिथे दिसून येत आहेत. भाजप पक्षाअंतर्गत कुरघोडी देखील संपलेली नाही. पूनम महाजन यांचे रखडलेले तिकीट, साताऱ्याचा निर्णय किंवा खडसेंच्या घरात दिलेले तिकीट, एकनाथ खडसे यांची अमित शहा यांच्याशी झालेली भेट त्यानंतर फडणवीस गटाची अस्वस्थता. त्यातून गिरीश महाजन यांच्याकडून खडसे यांच्याबाबत करण्यात आलेले वक्तव्य, त्यानंतर खडसे यांना पक्षात घेतले जाणार असल्याचे आपल्याला ठाऊकच नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला खुलासा हे त्या पक्षाच्या अंतर्गत काय चालले आहे ते स्पष्टपणे दाखवत आहेच. पण, त्याच बरोबर सुनील देवधर, विनय सहस्रबुद्धे यांना राहिलेल्या मतदार संघापैकी  प्रमुख जागांवर उतरवले जाण्याची चर्चाही खूप जोर धरत आहे.

ठाकरे विरुद्ध ठाकरे

राज ठाकरे कोणती भूमिका घेणार असा प्रश्न यापुढे विचारावा लागणार नाही, इतके राज ठाकरे प्रेडीक्टेबल झालेले आहेत. जी उध्दव यांची भूमिका असेल नेमकी त्याच्या विरोधी भूमिका राज ठाकरे घेणार हे आता सरावाने महाराष्ट्राला सहज समजायला लागेल अशी स्थिती आहे. 2014 पूर्वी त्यांनी मोदींची स्तुती केली. विधानसभा येईपर्यंत शिवसेना भाजप युती तुटली. पण, राज यांचा पक्ष त्याचवेळी सावरला असता तर त्याने आतापर्यंत मोठी मजल मारली असती. त्यावेळी उध्दव ठाकरे बाळासाहेबांच्या मृत्यू पश्चात लढले आणि खूप मोठे यश मिळवले. त्यानंतर ते त्यांच्या पद्धतीचे पण आपल्या मनासारखे निर्णय करून घेणारे राजकारण करू लागले. पण, राज यांचे राजकारण हळूहळू प्रतिक्रियावादी झाले. पण, भूमिकेत बदलाने मनसेचे नुकसानच होत चालले आहे. जेव्हा उध्दव ठाकरे भाजप सोबत असतात तेव्हा राज काँग्रेससाठी व्हिडिओ लावतात आणि जेव्हा ते काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत असतात तेव्हा यांना भाजपशी जुळवून घेण्याची घाई लागते. आपल्याला जागावाटप तडजोड जमत नाही अशी कबुली त्यांनी सभेत दिली तेव्हा तर शिवसेना सोडताना त्यांनी ज्या चार नेत्यांना क्लार्क म्हणून हिणवले होते, त्यांच्या कामगिरीचे महत्त्व राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकारांना अधिक जाणवले असेल. अनेकदा स्पष्ट बोलणे किंवा माघार घेणे दोन्ही गोष्टी नेतृत्व करू शकत नाही.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.