For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकणात महायुतीतच ‘नंबर 1 वरून’ चढाओढ

06:30 AM Aug 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोकणात महायुतीतच ‘नंबर 1 वरून’ चढाओढ
Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सुप्रीम कोर्टाने नुकतीच मंजुरी दिली. त्यानंतर ‘मिनी विधानसभा’ म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. मिनी विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोकणामध्ये बॅकफूटवर गेलेली महाविकास आघाडी आपल्या अस्तित्वासाठी लढेल. मात्र, दुसरीकडे महायुती झाली तर ठीक, पण अंतर्गत कुरबुरीमुळे महायुतीमधील सेना-भाजपामध्येच वरचढ कोण? यासाठी खरी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे तोंडावर आलेल्या गणेशोत्सवामध्ये आणि आगामी दिवाळीत निवडणुकीत हवा कुणाची, याची झलक पाहायला मिळणार आहे.

Advertisement

गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेल्याने निवडणुका रखडलेल्या होत्या. मात्र, सुप्रीम कोर्टाने 4 ऑगस्टला महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका नव्या प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगानेही टप्प्याटप्प्याने निवडणुका घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार असल्याने ‘मिनी विधानसभा’ म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीसाठी गेली तीन वर्षे डोळे लावून बसलेल्या इच्छुक उमेदवारांचे आता आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका ऑक्टोबर, डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांपूर्वी येणारा गणेशोत्सव आणि दिवाळी सण तेजीत जाणारा ठरू शकतो. निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार सणांमध्ये लोकांच्या गाठीभेटी वाढवून चाचणी करू शकतात. त्यामुळे आगामी सणात निवडणुकीचा उत्साह जाणवू शकतो.  प्रत्येक राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची सद्यस्थिती पाहता, महाविकास आघाडी बॅकफुटवर आहे. त्यामुळे महाविकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरली, तरी खरी लढत महायुतीमधील सेना-भाजप मित्रपक्षांमध्येच होऊ शकते. प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत काही राजकीय चित्र बदलल्यास मात्र वेगळे रिझल्ट दिसू शकतात.

Advertisement

कोकणात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बॅकफूटवर गेलेली आहे. महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आपले अस्तित्व जपण्यासाठी धडपड करीत आहे. कोकणातून विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले एकमेव आमदार भास्कर जाधव व अन्य पदाधिकारी रत्नागिरी जिह्यात ठाकरे सेनावाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. सिंधुदुर्ग जिह्यात माजी आमदार वैभव नाईक व अन्य पदाधिकारी ठाकरे सेना टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सत्ता नसल्याने ठाकरेसेनेतील नवे, जुने पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे सेना आपले अस्तित्व किती टिकवून ठेवते, यावरच पुढील राजकीय भवितव्य ठरणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्याने महायुती कोकणात सध्या जोशात आहे. परंतु, अंतर्गत कुरबुरीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होणार की स्वतंत्र लढणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. लोकसभा निवडणुकीत कोकणच्या इतिहासात भाजपाचा पहिला खासदार नारायण राणे यांच्या रुपाने मिळाला. त्यामुळे कोकणात भाजपाची ताकद वाढल्याचे दिसून आले, पण विधानसभा निवडणुकीत भाजपाला आठपैकी एकच जागा वाट्याला आली. शिंदे सेनेने जास्तीच्या जागा घेतल्या आणि निवडूनही आणल्या. त्यामुळे भाजपाने बुथ लेवलपासून जिल्हा पातळीपर्यंत संघटना मजबूत करूनही कोकणात शिवसेनेचे जास्त आमदार असल्याने भाजपापेक्षा शिंदे सेना  वरचढ ठरत आहे.

भाजपचे नारायण राणे खासदार झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचे सुपुत्र नीतेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून भाजपाने तिकीट दिले. त्याच वेळी खासदार राणेंचे दुसरे सुपुत्र नीलेश राणे कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु, एकाच घरात दोन-दोन तिकिटे नको म्हणून महायुतीमध्ये अॅडजस्टमेंट केली गेली व नीलेश राणे यांना शिंदे सेनेतून कुडाळ मतदारसंघाचे तिकीट दिले आणि ते निवडूनही आले. निवडून आल्यानंतर ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, त्या पक्षाची वाढ करण्याची जबाबदारी वाढली आणि त्यांनी शिंदे सेनेत अनेकांचे पक्षप्रवेश सुरू केले. त्यात महाविकास आघाडीतील ठाकरे सेनेचे पदाधिकारी, सरपंच यांचे प्रवेश घेतलेच. पण, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश घेण्याचा सपाटा सुरू केला. ज्या पक्षातून निवडून आले आणि त्या पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, हे त्यांचे चुकले नाही. परंतु, आपल्याच मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मित्रपक्षाने मदत केली, त्याच भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी सुरू केल्याने सिंधुदुर्गात शिंदे सेना आणि भाजपामध्ये अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी तर या पक्षप्रवेशाबाबत थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे आमदार नीलेश राणे यांनी थोडीशी नरमाईची भूमिका घेत मित्र पक्षाला त्रास होईल असे वर्तन करू नका, अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या. परंतु, ही नरमाईची भूमिका घेईपर्यंत भाजपचे अनेक महत्त्वाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे वरवरचे समेट झाल्याचे भासत असले तरी, अंतर्गत कुरबुरी सुरुच आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात विरोधकांपेक्षा मित्रपक्षांमध्येच कुरबुरी वाढल्या आहेत. या कुरबुरी न मिटल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे हे भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे आपल्या जिह्यात भाजपावाढीसाठी आणि जिल्हा परिषदेसह नगरपालिकांवर सत्ता मिळविण्यासाठी त्यांची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. त्यांनी आपल्या कणकवली मतदारसंघावर पूर्णपणे पकड मिळविलेली असली तरी आता ते जिह्याचे पालकमंत्री असल्याने कुडाळ व सावंतवाडी मतदारसंघावर आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांना स्वकियांशीच म्हणजेच मित्रपक्ष शिंदे सेनेशीच झगडावे लागणार आहे. मात्र, शिंदेसेनेचे दोन आमदार असल्याने शिंदे सेनाही सत्ताकेंद्रे मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे वरचढ कोण, यासाठी मित्र पक्षातच लढत रंगू शकते.

रत्नागिरी जिह्यातही रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, शिंदे सेना स्वतंत्रपणे लढण्यासाठी तयार आहे. कोकणात शिंदे सेना एक नंबरचा पक्ष बनविणार, असे वारंवार सांगत असतात. त्यामुळे रत्नागिरी जिह्यातही सेना विऊद्ध भाजपामधील कुरबुरी वाढल्या आहेत. शिंदे सेनेचे तीन आमदार, ठाकरे सेनेचे एक आमदार आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार आहेत. त्यामुळे संमिश्र राजकीय पक्षाची ताकद असली, तरी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत आपली जिह्यावरील पकड अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताकेंद्र मिळविण्यासाठी आतापासूनच कामाला लागले आहेत. भाजपाचे विनय नातू व अन्य पदाधिकारी वारंवार त्यांना प्रत्युत्तर देत भाजपची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर खासदार नारायण राणे व मंत्री नीतेश राणे हे सुद्धा दौरे करून रत्नागिरीत भाजप वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवही ठाकरे सेना वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गात महाविकास आघाडी विऊद्ध महायुती अशा लढतीपेक्षा महायुतीमधील मित्रपक्षच एकमेकांविऊद्ध वर्चस्वाच्या लढाईसाठी उभे ठाकणार का, याची उत्सुकता लागली आहे.

Advertisement
Tags :

.