For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवघ्या दीड दिवसात टीम इंडियाची ‘केपटाऊन’ मोहिम फत्ते

06:05 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
अवघ्या दीड दिवसात टीम इंडियाची ‘केपटाऊन’ मोहिम फत्ते
Advertisement

द.आफ्रिकेवर 7 गड्यांनी मात, दुसरी कसोटी जिंकत भारताची मालिकेत 1-1 अशी बरोबरी : मोहम्मद सिराज सामनावीर तर डीन एल्गार-जसप्रित बुमराह मालिकावीर पुरस्कारचे मानकरी

Advertisement

वृत्तसंस्था /केपटाऊन

येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने अवघ्या दीड दिवसात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 7 गड्यांनी धुव्वा उडवला. या विजयासह दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. विशेष म्हणजे, भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदाही केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकला नव्हता. अखेर हा इतिहास बदलला असून भारताने दुसऱ्या कसोटीत आफ्रिकन संघाचा दारुण पराभव केला. तसेच भारत हा केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकणारा आशिया खंडातील पहिला संघ ठरला आहे. सोबतच कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात छोटा सामना ठरला.

Advertisement

गोलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर फलंदाजांचा चांगलाच घाम निघाला. पहिल्या डावात यजमान संघ 55 धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर टीम इंडियाने 153 धावा करुन सर्व विकेट्स गमावल्या होत्या. पहिला डाव संपल्यानंतर भारतीय संघाकडे 98 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात मार्करमच्या शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने 176 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या व टीम इंडियाला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य भारताने अवघ्या तीन गड्यांच्या मोबदल्यात पार करत विजयाला गवसणी घातली. यासह केपटाऊनमध्ये कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवून देणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.

अवघ्या दीड दिवसात आफ्रिकेचा धुव्वा

तत्पूर्वी, 3 बाद 62 धावसंख्येवरुन आफ्रिकन संघाने तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण अवघ्या 114 धावांची भर घातल्यानंतर यजमान संघाचा दुसरा डाव 36.5 षटकांत 176 धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकात डेव्हिड बेडिंगहॅमला बुमराहने यष्टीरक्षक केएल राहुलकरवी झेलबाद केले. बेडिंगहॅमला केवळ 11 धावा करता आल्या. यानंतर बुमराहने काइल व्हेरेनलाही (9) स्वस्तात बाद केले. व्हेरेन बाद झाल्यानंतर आफ्रिकेची अवस्था 5 बाद 85 अशी झाली होती. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर मार्करम वगळता इतर कोणत्याही आफ्रिकन फलंदाजाला मैदानावर टिकाव धरता आला नाही. द. आफ्रिकेचे फलंदाज एकामागोमाग तंबूत परतत राहिले पण दुसऱ्या टोकाने मार्करम आक्रमक फलंदाजी करत होता. मार्करमने 99 चेंडूत आपले कसोटीतील सातवे शतक पूर्ण केले. त्याने 17 चौकार आणि 2 षटकारांसह 106 धावांचे योगदान दिले. मार्करम बाद झाल्यानंतर रबाडा व एन्गिडीही स्वस्तात बाद झाल्याने आफ्रिकेचा दुसरा डाव 176 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 61 धावांत 6 गडी बाद केले. मुकेश कुमारने 2 तर प्रसिद्ध कृष्णा, सिराजने एक एक विकेट घेतली. आफ्रिकेचा दुसरा डाव 176 धावांत संपला व टीम इंडियाला विजयासाठी 79 धावांचे टार्गेट मिळाले. हे टार्गेट भारताने 12 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 6 चौकारासह 28 धावा केल्या. रोहित शर्माने 2 चौकारासह नाबाद 16 धावा केल्या तर विराट कोहलीने 2 चौकारासह 12, शुबमन गिलने 2 चौकारासह 10 धावांचे योगदान दिले. श्रेयस अय्यर 4 धावांवर नाबाद राहिला.

नव्या वर्षातील पहिलाच दौरा यशस्वी, आफ्रिका दौऱ्याची सांगता

आयसीसी वनडे वर्ल्डकप संपल्यानंतर भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर पोहोचला. या दौऱ्यात तीन टी-20, तीन वनडे व दोन कसोटी सामन्यांचा समावेश होता. उभय संघातील टी-20 मालिका बरोबरीत संपली तर वनडे मालिकेत टीम इंडियाने यश मिळवले. कसोटी मालिकेतही बरोबरी साधत भारतीय संघाने आफ्रिका दौऱ्याची यशस्वी सांगता केली. आता, मायदेशात पुढील आठवड्यात भारत व अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.

आमच्यासाठी हा विजय नक्कीच खास आहे : कर्णधार रोहित शर्मा

सेंच्युरियन कसोटीत डावाने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत मोठी सुधारणा केली. पहिल्या कसोटीत आम्ही ज्या चुका केल्या त्यामधून जे शिकलो, त्यामुळे हा विजय मिळवता आला. हा विजय आमच्यासाठी नक्कीच खास आहे, असे प्रतिपादन कर्णधार रोहित शर्माने केले. या विजयाचे श्रेय सिराज आणि बुमराह यांना तर आहेच. पण त्यांना चांगली साथ देणाऱ्या मुकेश कुमार, प्रसिध्द कृष्णा यांनीही त्यांना चांगली साथ दिली. शेवटची कसोटी खेळणाऱ्या कर्णधार एल्गारलाही त्याने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली खास जर्सी त्याला भेट दिली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडिया पुन्हा अव्वलस्थानी

भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत  दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठा फायदा झाला आहे. गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाने थेट अव्वलस्थानी झेप घेतली आहे. आफ्रिकेची दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून न्यूझीलंड तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या तर बांगलादेश पाचव्या स्थानावर आहे. सध्याच्या घडीला गुणतालिकेत भारत 26 गुणांसह अव्वल आहे आणि एकूण गुणांची टक्केवारी 54 टक्के आहे. भारत आता इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका एकतर्फी किंवा 4-1 फरकाने जिंकल्यास टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील स्थान जवळपास निश्चित होणार आहे.

बुमराहचा अनोखा विक्रम, श्रीनाथ यांच्या विक्रमाशी केली बरोबरी

बुमराह केवळ भारतीयच नाही तर परदेशी पीचेसवरही प्रभावी ठरतो, याचा प्रत्यय आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा आला. 61 धावांत 6 बळी घेताना बुमराहने आफ्रिकन फलंदाजांचे कंबरडे मोडले. यासह त्याने आफ्रिकन भूमीत तिसऱ्यांदा पाच बळी घेण्याची किमया केली. ही कामगिरी करताना त्याने भारताचा माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. श्रीनाथ यांनी आफ्रिका दौऱ्यात तीन वेळा पाच बळी घेतले आहेत. याशिवाय, बुमराहने इंग्लंडमध्ये दोनवेळा, वेस्ट इंडिजमध्ये दोनवेळा आणि ऑस्ट्रेलियात एकवेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

केपटाऊनमधील विजयाचा दुष्काळ संपुष्टात

केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये भारताला 4 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर 2 सामने अनिर्णित राहिले होते. भारतीय संघ 1992 पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे, परंतु केपटाऊनमध्ये भारताने एकही कसोटी जिंकलेली नव्हती. पण आता भारताने विजयाचा दुष्काळ संपवला आहे. एवढेच नाही तर केपटाऊनमध्ये कोणत्याही आशियाई देशाचा हा पहिला कसोटी विजय ठरला आहे. याशिवाय, भारताचा हा आफ्रिकेतील आतापर्यंतचा एकूण पाचवा विजय ठरला आहे. याआधी, भारताने 2006 जोहान्सबर्ग कसोटी, 2010 दरबान कसोटी, 2018 जोहान्सबर्ग कसोटी, 2021 सेंच्युरियन कसोटी व 2024 केपटाऊन कसोटीत विजय संपादन केला आहे.

अवघ्या 642 चेंडूत कसोटी निकाली

कसोटी क्रिकेटमध्ये अनेक सामने 5 दिवसांचा खेळ झाल्यानंतरही निकाली निघत नाही. पाच दिवसांच्या या सामन्यात बहुतांश वेळा दोन्ही संघ दोन वेळा सर्वबाद होत नाहीत. अशा वेळा सामना अनिर्णित होतो. पण भारत आणि आफ्रिका यांच्यात झालेला दुसरा सामना अवघ्या दीड दिवसात (5 सत्रात) निकाली निघाला. गोलंदाजीसाठी अनुकूल असणारी खेळपट्टीमुळे फलंदाजांना धावा करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. परिणामी हा दुसरा कसोटी सामना अवघ्या 642 चेंडूत संपला. चेंडूंच्या बाबतीत हा सर्वात लहान कसोटी सामना ठरला. अवघ्या 642 चेंडूत (नो बॉल व वाईड बॉल वगळून) सामना निकाली निघाला. तब्बल 92 वर्षापूर्वीचा जुना विक्रम या सामन्यादरम्यान मोडीत निघाला.

सर्वात कमी चेंडूत निकाली कसोटी

  • 642 चेंडू - भारत वि द.आफ्रिका, केपटाऊन 2024.
  • 656 चेंडू - द.आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया, मेलबर्न 1932
  • 672 चेंडू - वेस्ट इंडिज वि इंग्लंड, ब्रिजटाऊन 1935.

संक्षिप्त धावफलक

  • दक्षिण आफ्रिका प.डाव 55 व दुसरा डाव 36.5 षटकांत सर्वबाद 176 (मार्करम 106, डीन एल्गार 12, बेडिंगहॅम 11, मार्को जॅन्सेन 11, बुमराह 61 धावांत 6 बळी, मुकेश कुमार 56 धावांत 2 बळी).
  • भारत प.डाव 153 व दुसरा डाव 12 षटकांत 3 बाद 80 (शुबमन गिल 28, रोहित शर्मा नाबाद 16, शुबमन गिल 10, विराट कोहली 12, श्रेयस अय्यर नाबाद 4, रबाडा, बर्गर व जॅन्सेन प्रत्येकी एक बळी).
Advertisement
Tags :

.