आमदार पी.एन.पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
जिल्हा काँग्रेसचे नेते आणि करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांच्यावर आज य़शस्वी शस्त्रक्रिया पार पडली. मेंदुच्या रक्तस्त्रावामुळे आलेल्या सुजीवर ही शस्त्रक्रिया होती. आज दुसऱ्या दिवशी त्यांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असून सोशल मीडीयावर फिरणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नका असे आवाहन त्यांचे पुत्र राहूल पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्याचे जेष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील हे काल बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना कालच अॅस्टर आधार हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या मेंदुचे सिटीस्कँन केल्यावर मेंदुमध्ये रक्तस्त्राव झाल्याने थोडी सुज आल्याचे दिसून आले.
दरम्यान, पी.एन. पाटील यांच्या मेंदुमधील रक्तस्त्रावाची शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईवरून प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. सुहास बराले यांना बोलावण्यात आले होते. आज सकाळी त्यांच्यावरील ही शस्त्रक्रिया पार पाडली असून त्यांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
माध्यमांशी बोलताना पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील यांनी "सोशलमीडीयावर फिरणाऱ्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका. पी. एन पाटील साहेबांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्ये साहेबांच्या प्रेमापोटी हॉस्पीटलमध्ये गर्दी करत आहेत. त्यांना आवाहन आहे की त्यांनी हॉस्पीटलमध्ये न येता साहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी."
दरम्यान, घटनेची माहीती मिळताच जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच पी.एन. पाटील समर्थक यांनी अॅस्टर आधार हॉस्पीटलच्या परीसरामध्ये गर्दी केली. तसेत सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील अनेक लोकांनी हॉस्पीटलकडे धाव घेत पी.एन. पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.