जपानमध्ये सत्तारुढ पक्षाला मिळाला मोठा विजय
शिंजो आबे यांच्या हत्येनंतर सहानुभूतीचे वातावरण
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची अलिकडेच झालेल्या हत्येनंतर तेथील सत्तारुढ पक्षाला प्रचंड सहानुभूती मिळाली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या संसदीय निवडणुकीच्या निकालात आबे यांच्या पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. जपानमधील सत्तारुढ पक्ष आणि त्याच्या आघाडीतील घटक पक्षांनी रविवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.
आबे यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने स्वतःच्या आघाडीतील सहकारी पक्ष कोमितोसोबत हा विजय मिळविला आहे. पक्षाने वरिष्ठ सभागृहातील निम्म्या जागांच्या निवडणुकीत यश मिळवत स्वतःचे संख्याबळ वाढवून 146 केले आहे. हा आकडा बहुमतापेक्षा खूपच अधिक आहे.
या निवडणुकीत विजय मिळविण्यासह पंतप्रधान फुमियो किशिदा आता 2025 च्या निवडणुकीपर्यंत विना अडथळा सरकार चालवू शकणार आहेत. हा विजय किशिदा यांना राष्ट्रीय सुरक्षा, नवे भांडवलवादी आर्थिक धोरण आणि अनेक प्रलंबित विधेयके मार्गी लावण्याचे बळ पुरविणार आहे. किशिदा यांनी मोठय़ा विजयाचे स्वागत केले असले तरीही आबे यांची हत्या आणि त्यांच्याशिवाय स्वतःच्या पक्षाला एकजूट ठेवण्याच्या जबाबदारीचा दबाव त्यांच्या चेहऱयावर दिसून येत होता.
पुढील काळात कोरोनाविरोधी लढाई, युक्रेनवरील रशियाचे आक्रमण आणि वाढत्या महागाईला रोखणे हीच आमची प्राथमिकता असणार आहे. जपानची राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासह एका घटनात्मक दुरुस्तीवरही सातत्याने भर देत राहू असे किशिदा यांनी म्हटले आहे.