जैन धर्मामध्ये गुरु शिष्यांची परंपरा मोठी
हलगा येथे आचार्य श्री 108 श्री बाहुबली मुनीमहाराज यांच्या 94 व्या जयंती उत्सवाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन
वार्ताहर/सांबरा
समाजामध्ये सामाजिक समता, बंधुता,सलोखा जपण्यासाठी व समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर जैन तत्त्वज्ञानाचे सर्वांनी आचरण करणे काळाची गरज बनली आहे. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अस्तेय, तसेच अनेकतावाद या तत्त्वांच्या आचरणाची गरज आज समाजाला भासत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. ते बुधवार दि. 10 रोजी हलगा येथे आचार्य श्री 108 श्री बाहुबली मुनीमहाराज यांच्या 94 व्या जयंती उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, माणसाने माणसाशी माणसासारखे कसे राहावे, याची सारी शिकवणूक जैन तत्त्वज्ञानामध्ये दिली आहे. जैन धर्मामध्ये गुरु शिष्यांची परंपरा फार मोठी आहे, आणि आज बालाचार्य डॉ. 108 श्री सिद्धसेन मुनी महाराज हे आपले गुरु आचार्य श्री बाहुबली मुनी महाराज यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आज इथे सर्व दोष प्रायश्चित विधान करत आहेत. या अशा मंगल कार्यक्रमामध्ये आम्हाला उपस्थित राहणं हे आमचे भाग्यच आहे, असे सांगितले.
बालाचार्य डॉ. 108 सिद्धसेन मुनी महाराज यांच्या दिव्य सानिध्याखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रा. भरत अळसंदी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर होत्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री डी. सुधाकर, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार एन. एच. कोणरेड्डी, विधान परिषद सदस्य नासीर अहमद, धर्मस्थळचे प्रमुख डॉ. खासदार वीरेंद्र हेगडे, त्यांचे बंधू सुरेंद्र हेगडे, सुनील हनमन्नावर, डॉ. एम. एन. मगदूम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या शुभ हस्ते भगवान बाहुबली मूर्ती प्रतिष्ठापनेचा पायाखोदाईचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी मंत्री व विद्यमान आमदार बसनगौडा पाटील, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार लक्ष्मण सवदी उपस्थित होते. यावेळी हलगा परिसरातील श्रावक, श्रावकी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम शुक्रवार दि. 12 डिसेंबरपर्यंत सुरू असणार आहे. शेवटी सुनील पद्मन्नावर यांनी आभार मानले. श्री 108 बालाचार्य डॉ. सिद्धसेन मुनी महाराज अध्यात्मिक अनुसंधान फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.