Ishwarpura municipal election : ईश्वरपुरात नगराध्यक्षपदाचे 4 तर नगरसेवकपदाचे 86 अर्ज अवैध
ईश्वरपूर निवडणुकीत धडाकेबाज छाननी! १४ पैकी ४ अध्यक्षांचे अर्ज बाद
ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जामधील १४ पैकी ४ अर्ज तर नगरसेवक पदाच्या २७२ अर्जातील ८६ अर्ज अवैध ठरले. छाननी नंतर रिंगणात नगराध्यक्षपदाचे १० तर नगरसेवक पदाचे १८६ उमेदवारी अर्ज उरले आहेत. मंगळवारी झालेल्या या छाननीत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाचे प्रभाग क्रमांक १४ अ चे उमेदवार शहाजी पाटील व प्रभाग १३ अ मधील महायुतीचे उमेदवार मन्सूर मोमीन यांच्या अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आक्षेप घेतला. मात्र सुनावणीत हे दोन्ही अर्ज वैध ठरले.
उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले. त्यामुळे प्रशासनावर अचानक ताण वाढला. संपूर्ण प्रक्रीया पूर्ण करण्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना मंगळवारची पहाट उजाडली. मंगळवारी ११ वाजल्यापासून छाननीला सुरुवात झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती किरण कुलकर्णी यांनी काम पाहिले. छाननीची प्रक्रिया सांयकाळी ५ वाजेपर्यंत सुरु होती.
छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली. महायुतीतील सर्वच पक्षांनी आपआपले एबी फॉर्म देवून उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे यातील बहुतांशी अर्ज तांत्रिक कारणावरुन अवैध ठरले. प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस श.प.चे शहराध्यक्ष शहाजी पाटील व त्यांचे चुलत पुतणे भाजपाचे राजवर्धन पाटील यांनी कुणबी दाखल्याच्या आधारे नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
छाननी दरम्यान राजवर्धन पाटील यांनी शहाजी पाटील यांच्या ईश्वरपुरातील सर्व्हे नं. ७२ मधील अनाधिकृत बांधकामाबाबत आक्षेप नोंदवला. यावर झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांनी वकीलांमार्फत युक्तीवाद केला. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हा निवडणुकी नंतरचा तक्रारीचा भाग असल्याचे सांगून शहाजी पाटील यांचा अर्ज वैध ठरवला.
दरम्यान प्रभाग १३ मधील भाजपाचे उमेदवार मन्सूर मोमीन यांच्या गौण खनिज उत्खनना बाबत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी आक्षेप घेतला होता. यावर ही सुनावणी होवून मोमीन यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला.
नगराध्यक्षपदाचे वैध उमेदवार
विश्वनाथ रामचंद्र डांगे, सतिश शिवाजी इदाते. शाकीर इसालाल तांबोळी, आनंदराव संभाजी मलगुंडे, पंजाबराव साहेबराव पवार, नामदेव शंकर चव्हाण, सागर हणमंतराव मलगुंडे, यशवंत बाळासाहेब श्रीराम, इजाज शहानवाज मुजावर