महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हुबळी-धारवाड जात्यात तर बेळगाव सुपात?

01:03 PM May 20, 2024 IST | VISHAL_G
Advertisement

तरुणाईमध्ये वाढती व्यसनाधीनता : जुगार-सट्टा-कॅसिनोपायी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

हुबळी-धारवाड येथे केवळ महिनाभरात दोन तरुणींची भीषण हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने बेळगावसह संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळल्याचा आरोप करीत पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील परिस्थितीचा आढावा घेतला असता बेळगाव शहरही गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचे सामोरे येत आहे.

सध्या पोलीस दलावर टीका केली जात आहे. 18 एप्रिल रोजी हुबळी येथील बीव्हीबी महाविद्यालयाच्या आवारात नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीची हत्या झाली होती. फय्याज, रा. मुनवळ्ळी याने ही हत्या केली होती. हे प्रकरण तर केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ठळक चर्चेत आले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील निवडणूक प्रचारात या प्रकरणाचा उल्लेख केला होता.

या घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच त्याच हुबळी-धारवाड या जुळ्या शहरात 15 मे रोजी अंजली अंबिगेर या तरुणीची हत्या झाली आहे. विश्वनाथ ऊर्फ गिरीश सावंत याला नाट्यामयरित्या दावणगेरीजवळ रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. विश्वनाथने अंजलीला नेहा हिरेमठसारखे संपविण्याचे धमकावले होते. अंजलीच्या आजीने पोलिसांना यासंबंधी माहिती दिली होती. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही.

या दोन्ही प्रकरणांचे पडसाद केवळ हुबळी-धारवाडमध्येच नव्हे तर शेजारच्या बेळगाव, विजापूरसह संपूर्ण राज्यात उमटले. जनक्षोभ वाढताच राज्य सरकारने पोलीस निरीक्षक सी. बी. चिकोडी, महिला पोलीस हवालदार रेखा हावरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर या दोन्ही हत्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त एम. राजू यांनाही निलंबित करण्यात आले. या कारवाईचा पोलीस यंत्रणेने धसका घेतला आहे.

हुबळी-धारवाडप्रमाणेच बेळगाव शहरही गुन्हेगारीच्या विळख्यात सापडले आहे. खून, खुनी हल्ले, बलात्कार आदी प्रकरणांबरोबरच अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहर व उपनगरात जुगारी अ•s उदंड झाले आहेत. मटक्यावरही नियंत्रण नाही. याहीपेक्षा सध्या सुरू असलेल्या आत्महत्या प्रकरणांमुळे बेळगावकरांची चिंता वाढली आहे.

कॅसिनोचा नाद नडल्यामुळेच चोरी

गेल्या चार महिन्यांत आत्महत्या करणाऱ्यांची संख्या व त्याची कारणे लक्षात घेता जुगार व कॅसिनोच्या नादापायी कर्जबाजारी होऊन अनेकांनी आपले जीवन संपविले आहे. कॅसिनोसाठी बेळगाव येथून रोज रात्री अनेक वाहने गोव्याला जातात. रात्रभर सट्टा लावून आहे ते सर्व गमावून सकाळी बेळगावला परततात. अलीकडच्या दिवसात पोलिसांनी चोऱ्या, घरफोड्यांप्रकरणी पकडलेल्या अनेक गुन्हेगारांनाही कॅसिनोचा नाद नडल्यामुळेच ते चोरी करीत आहेत, असे अनेक प्रकरणात आढळून आले आहे.

हुबळी-धारवाड या जुळ्या शहरात झालेल्या दोन तरुणींच्या भीषण हत्येमुळे आता सगळ्याच भागातील गुन्हेगारी कारवायांची व कायदा-सुव्यवस्था परिस्थितीची उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. अनेकवेळा पोलीस दलाला माहिती असूनही आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई केली जात नाही. बेळगाव परिसरात जुगारी अ•s थाटलेले अनेक जण लक्षाधीश, कोट्याधीश बनले आहेत. त्या अड्यावर खेळणाऱ्यांपैकी अनेकांना कर्जबाजारीपणामुळे जीव गमवावा लागला आहे.

गेल्या गुरुवार दि. 16 मे रोजी सायंकाळी पुदुच्चेरी-दादर चालुक्य एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका माथेफिरुने टीसीसह रेल्वे कर्मचाऱ्यांवर धावत्या रेल्वेत चाकूहल्ला केला. त्या हल्ल्यात देवर्षी वर्मा (वय 25) रा. उत्तरप्रदेश या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेला चार दिवस उलटले तरी हल्लेखोराचा थांगपत्ता लागत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे रेल्वेप्रवासीही धास्तावले आहेत.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारला लक्ष्य बनवताच सरकारी यंत्रणा जागी झाली आहे. रविवारी कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र हे हुबळी-धारवाडला आले होते. त्यांच्यापाठोपाठ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर हेही येणार आहेत. गृहखात्याने बेळगावात वाढलेल्या गुन्हेगारीची दखल घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोकाच अधिक आहे.

उच्च न्यायालयाचेही ताशेरे...

बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. आपली समस्या घेऊन पोलीस स्थानकात जाणाऱ्या नागरिकांना अधिकारी व कर्मचारी चांगली वागणूक देत नाहीत, असा आरोप आहे. अनेक अधिकारी तर फोनही उचलत नाहीत. गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलीस दलाबद्दल विश्वास निर्माण करण्याऐवजी प्रतिमा कशी खालावेल, अशीच वागणूक अधिकाऱ्यांकडून मिळते आहे. बेळगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर काही प्रकरणात उच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. आता तर अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांनीही पोलिसांबद्दलचा विश्वास कमी होत चालला आहे. तो अधिक वृद्धिंगत करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज बोलून दाखविली आहे. सध्या आयपीएलवर बेटिंग वाढले आहे. बेटिंगमुळेही अनेकजण कंगाल झाले आहेत. हे गैरधंदे थांबले नाहीत तर भविष्यात कंगाल होऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article