‘हिडकल’मध्ये हिरण्यकेशी, घटप्रभेतून आवक वाढली
आंबोली ‘हिरण्यकेशी’चे उगमस्थान : पावसाची संततधार सुरूच : तालुका प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा : हिरण्यकेशी, घटप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ
परशराम शिसोदे /संकेश्वर
हुक्केरी तालुक्यात कामधेनू म्हणून नावारुपास आलेला हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशय घटप्रभा नदीवर उभारला आहे. या जलाशयाच्या लाभार्थी क्षेत्राची व्याप्ती बेळगाव व विजापूर या दोन जिल्ह्याशी जोडलेली आहे. या जलाशयावर 6 लाख 34 हजार 894 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास दरवर्षी मदत होते. तथापि या जलाशयाला हिरण्यकेशी, ताम्रपर्णी व घटप्रभा या तीन नद्यांतून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते. जलाशयासाठी या तिन्ही नद्या दुवा ठरल्या आहेत. महाराष्ट्राच्या आंबोली घाटमाथ्यावर हिरण्यकेशी देवीमुळे हिरण्यकेशी नदीचा उगम झाला आहे. 7 गुहांमधून ही नदी प्रवाहित होत आजरा येथील व्हिक्टरिया पुलाखाली चित्री नदी हिरण्यकेशीला मिळते.
हिरण्यकेशी तशीच पुढे येत हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री येथे घटप्रभा नदीला मिळते. चंदगड तालुक्यातून आलेली ताम्रपर्णी नदी दड्डी येथे घटप्रभा नदीला मिळते. या दोन नद्यांचा संगम झाल्याने तो पुढे येऊन हुक्केरी तालुक्यातील व्हळेम्मा मंदिरनजीकच्या बडकुंद्री येथे हिरण्यकेशीला मिळतो. या तिन्ही नद्यांच्या प्रवाहाचे पाणी घटप्रभा नदीच्या माध्यमातून हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयाला मिळते. जलाशयाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता 51 टीएमसी आहे. त्यापैकी 2 टीएमसी पाणी मृतजलसाठा असून उर्वरित 49 टीएमसी पाणीसाठा उपयोगात आणला जातो. जलाशय क्षमतेनी भरल्यानंतर जलाशयातील अतिरिक्त पाणी कृष्णा नदीत सोडले जाते. यामुळे कृष्णा नदीला प्रत्येक वर्षी महापुराची अवस्था निर्माण होते.
1965 साली जलाशय बांधणीच्या कामाला सुरुवात झाली. जलाशयाचे काम पूर्णत्वाला येण्यासाठी सुमारे 20 वर्षे लागली. या जलाशयाची लांबी 10183 मीटर असून उंची 62.48 मीटर आहे. या जलाशयातून उपयोगात येणारे पाणी 46.68 टीएमसी आहे. तर उपयोगात न येणारे पाणी 2.13 टीएमसी आहे. जलाशयाच्या खाली गेलेली जमीन 15 हजार 600 एकर असून या ठिकाणी असणारी 22 खेडी पाण्याखाली गेली आहे. या जलाशयाला जोडलेला 202 कि. मी.चा उजवा कालवा आहे. तर 109 कि. मी. डावा कालवा आहे. जलाशयाच्या पाण्याखाली येणाऱ्या उजव्या कालव्यातील 1,55,567 हेक्टर आहे. तर डाव्या कालव्यातील क्षेत्र 1,61,880 हेक्टर आहे. या जलाशयातील पाणी बेळगाव जिल्ह्यातील 1,60,647 हेक्टर जमिनीत पुरवठा होते. तर विजापूर जिल्ह्यातील 1,56,800 हेक्टर जमिनीला पुरवठा केले जाते. या जलाशयाच्या माध्यमातून दोन विद्युत निर्मितीची उपकरणे बसविण्यात आली असून 32 मेगावॅट विजेची निर्मिती यामधून केली जाते. या जलाशय निर्मितीसाठी मार्च 1987 पर्यंत 134.39 कोटी रुपये खर्च आला आहे. जलाशयात 1979 साली पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली. हा जलाशय विजापूर व बेळगाव जिल्ह्याला वरदान ठरला आहे.
आजरा तालुक्यातील जलाशय
गत 10 वर्षांपासून आजरा तालुक्यात चित्री व त्यानंतर अलिकडील दोन वर्षांत अंबेहोळ व सर्पनाला या तिन्ही जलाशयाची उभारणी करण्यात आली आहे. कोकण पाणलोट क्षेत्रातील पाणी या जलाशयात साठा करून ठेवले जाते. हा जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त पाणी पुन्हा हिरण्यकेशीला सोडले जाते. यामुळे हिडकल जलाशयाला मिळणाऱ्या पाण्याचे स्त्राsत मुबलक आहे. म्हणूनच हिडकल जलाशयाला महाराष्ट्र पाणलोट क्षेत्राचे वरदान लाभले आहे.
गोटूर बंधारा पाण्याखाली
गत 20 दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी व मार्कंडेय नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे कर्नाटक व महाराष्ट्र दरम्यान होणारा लोकसंपर्क तुटला आहे. या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स घालून वाहतूकसेवा खंडित केली असून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. येत्या काळात जलाशय परिसरातील 22 खेड्यांमध्ये पाणी जाण्याचा अंदाज जलाशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
10 हजार क्युसेकने विसर्ग होणार
24 रोजी राजा लखमगौडा जलाशयात 43.22 टीएमसी पाणीसाठा तयार झाला असून घटप्रभा नदीमार्गे जलाशयात 31 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. सध्या जलाशयातून 2400 क्युसेक पाण्याचा वीज प्रकल्पासाठी विसर्ग केला जात आहे. बुधवारी दुपारनंतर पाण्याची वाढती आवक लक्षात घेता 10 हजार क्युसेक पाणी जलाशयातून विसर्ग केला जणार आहे, अशी माहिती जलाशय अधिकाऱ्यांनी दिली आहे.