हरियाणात ऊर्जामंत्र्यांची भाजपला सोडचिठ्ठी
तिकीट न मिळाल्याने नाराजी ; अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
वृत्तसंस्था/सिरसा
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे हरियाणाचे ऊर्जामंत्री रणजीत चौटाला यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपने बुधवारी 67 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर गुऊवारी त्यांनी समर्थकांची बैठक घेतली. त्यानंतर ऊर्जामंत्री रणजीत चौटाला यांनी पक्षत्याग करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच आता अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. भाजप हायकमांडने आपल्याला डबवली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले होते. पण, मला तिथून लढायचे नव्हते. मी याच क्षणी पक्ष सोडत असून रानिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. 8 सप्टेंबर रोजी रानिया येथे मोठा रोड शो घेऊन भाजपला ताकदीची जाणीव करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रणजीत चौटाला हे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने त्यांचा पक्षात समावेश करून हिस्सारमधून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. यानंतर ते पुन्हा सिरसामधील रानिया मतदारसंघातून विधानसभेच्या जागेसाठी तिकीट मागत होते. भाजपने रणजित चौटाला यांना मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा खात्याची जबाबदारी दिली होती. चौटाला यांच्यासाठी बंडखोरी ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी त्यांनी त्यांचे वडील देवीलाल यांचा पक्ष लोकदल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिले. पण, जेव्हा काँग्रेसने रानियान यांचे तिकीट रद्द केले तेव्हा त्यांनी 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवून भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. भाजप सरकारमध्ये ते ऊर्जामंत्री होते.