For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फॉर्मात असलेले राजस्थान, लखनौ आज भिडणार

06:56 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
फॉर्मात असलेले  राजस्थान  लखनौ आज भिडणार
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

राजस्थान रॉयल्स आज शनिवारी होणार असलेल्या आयपीएलच्या सामन्यात घरच्या मैदानावर बदला घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या लखनौ सुपर जायंट्सशी पुन्हा एकदा सामना करणार आहे. यावेळी आपल्या विजयाची गती कायम ठेवण्याचा आणि आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न राजस्थान करेल. माजी विजेता राजस्थान या मोसमात आठ सामन्यांतून सात विजयांसह जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे आणि एलएसजीला त्यांचे आव्हान जड जाऊ शकते.

लखनौ देखील चांगले क्रिकेट खेळला आहे आणि आठ सामन्यांतून पाच विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. पण आजच्या सामन्यात राजस्थानचे पारडे जड असेल. कारण त्यांनी गुजरात टायटन्सविऊद्धच्या पराभवानंतर विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. आसामचा फलंदाज रियान पराग हा फलंदाजी विभागात त्यांना गवसलेला नवा तारा ठरला आहे. आठ सामन्यांतून 318 धावा करून तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

Advertisement

यंदाच्या मोसमात थोडा संघर्ष करावा लागलेला यशस्वी जैस्वाल फॉर्ममध्ये परतल्याने राजस्थानची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. तो आणि जोस बटलर आघाडीला येऊन विलक्षण धडाका लावू शकतात. राजस्थानची फलंदाजी सामान्यत: कर्णधार संजू सॅमसनच्या भोवती फिरते, ज्याने आतापर्यंत 314 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर देखील चांगली फटकेबाजी करू शकतो. मात्र रोव्हमन पॉवेल आणि ध्रुव जुरेल यांनी अधिक योगदान देण्याची गरज आहे.

अनुभवी ट्रेंट बोल्ट, आवेश खान आणि संदीप शर्मा यांच्या रूपाने त्यांच्याकडे प्रभावी वेगवान मारा आहे. संघाचा फिरकी विभाग देखील युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन ही अनुभवी जोडी सांभाळत आहे. जरी चहलला या हंगामात संघर्ष करावा लागलेला असला, तरी आठ सामन्यांतू 13 बळींसह तो राजस्थानचा सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. दुसरीकडे, एलएसजी या मोसमातील पहिल्या सामन्यात राजस्थानकडून 20 धावांनी पराभूत झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यास उत्सुक असेल. सलग दोन विजयांमुळे के. एल. राहुलचा संघ देखील उत्साहात आहे.

राहुल आणि त्याचा सलामीचा जोडीदार क्विंटन डी कॉक फॉर्ममध्ये असून चेन्नई सुपर किंग्जविऊद्धच्या मागील सामन्यात मार्कस स्टॉइनिसने नाबाद शतक झळकावले. स्टॉइनिसचे पुनरागमन एलएसजीच्या मधल्या फळीसाठी दिलासादायक आहे. तिथे देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन आणि दीपक हुडा या खेळाडूंनी अधिक जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. गोलंदाजीच्या आघाडीवर वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीमुळे काही सामने बाहेर बसल्यानंतर आज खेळेल, अशी आशा लखनौ बाळगून असेल.

Advertisement
Tags :

.