ऐन दिवाळीत काळ्यादिनाचा अंधार
आकाशकंदील न पेटविण्याचे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन : मूक सायकलफेरी यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने स्वत:च्या हिमतीवर मागील 68 वर्षांपासून सीमालढा सुरू ठेवला आहे. दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी अन्यायाविरोधात मूक सायकलफेरी काढून निषेध व्यक्त केला जातो. यावर्षी दिवाळी असली तरी आकाशकंदील व दिवे न पेटविता मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचा निर्णय शहर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. तसेच यावर्षीचा काळादिन कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करणारच असा निर्धारही केला. सोमवारी रामलिंगखिंड गल्लीतील रंगुबाई भोसले पॅलेस येथे शहर म. ए. समितीची व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत काळादिन सायकल फेरीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पदाधिकारी बी. ए. येतोजी होते.
नेताजी जाधव म्हणाले, समितीने महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांना सायकल फेरीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करावे, तसेच तरुणाईला सामावून घेण्यासाठी व्यापक जागृती करण्याचे स्पष्ट केले. 1 नोव्हेंबर रोजी मोठ्या ताकदीने मूक सायकलफेरी काढण्याबरोबरच शहर समितीने आपले पदाधिकारी मध्यवर्तीवर नेमण्यासंदर्भात मदन बामणे यांनी सूचना केली. रणजित हावळण्णाचे म्हणाले, म. ए. समितीने प्रत्येक विभागात म्हणजेच शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, अनगोळ, मजगाव व शहराच्या इतर भागात जागृती सभा घ्याव्यात व 1 नोव्हेंबर रोजी संपूर्ण सीमाभागात काळादिन पाळून कोणत्याही मराठी भाषिकांनी आकाशकंदील अथवा दिवे लावू नयेत, अशी सूचना केली.
पोटतिडकीने मराठी भाषिक सीमाप्रश्नासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे काहीवेळा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात. या गुन्ह्यांमधून बाहेर पडण्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागतो. त्यासाठी संघटना म्हणून म. ए. समितीने हातभार लावावा, अशी सूचना शुभम शेळके यांनी केली. कन्नड भाषिकांपेक्षा मराठी भाषिकच आपल्या विरोधात कार्यरत असल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे प्रत्येक युवकापर्यंत सीमाप्रश्न पोहोचविण्यासाठी म. ए. समितीने प्रयत्न करावेत, असे अंकुश केसरकर यांनी सांगितले.
प्रकाश मरगाळे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांना काळ्यादिनात सहभागी होण्यासह जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाचा समावेश करण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. काळ्या दिनादिवशी दिवाळी असली तरी सकाळी लवकर पूजा करून काळ्यादिनाच्या मूक सायकल फेरीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण-पाटील, श्रीकांत कदम, अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी विचार मांडले. यावेळी मालोजी अष्टेकर, शिवराज पाटील, प्रशांत भातकांडे यांच्यासह इतर शहर समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.