‘धूम धाम’मध्ये यामी गौतम प्रतीक गांधी मुख्य नायक
यामी गौतम ही गुणवान अभिनेत्री लवकरच ‘धूम धाम’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे मजेशीर पोस्टर सादर करण्यात आले असून यात एका विवाहाची जाहिरात आहे. यात नायिका सुस्वभावी अन् सुंदर असल्याचे म्हणत विवाहासाठी अनेक अटी नमूद आहेत. या चित्रपटात यामीसोबत प्रतीक गांधी दिसून येणार आहे.
यामीचा हा आगामी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाची झलक शेअर केली आहे. पोस्टर वृत्तपत्रांमध्ये पारंपरिक शैलीत येणाऱ्या विवाहाच्या जाहिरातीच्या धर्तीवर आहे. एक युवती कोयल चड्ढा (यामी)ला युवकाचा शोध आहे. तर गुजराती युवक डॉ. वीर (प्रतीक) वधूच्या शोधात आहे. दोघांनीही स्वत:च्या मागण्यांचा रितसर जाहिरातांमध्ये उल्लेख केला आहे.
या चित्रपटाची निर्मिती यामीचे पती आदित्य धर करत आहेत. हा एक रोमँटिक कॉमेडी धाटणीचा चित्रपट आहे. या चित्रपटात यामी अन् प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत असल्याने या दोघांचे चाहते उत्सुक झाले आहेत. यामी अन् प्रतीकला त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.