For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसाममध्ये आमदाराचा काँग्रेसला रामराम

06:33 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आसाममध्ये आमदाराचा काँग्रेसला रामराम
Advertisement

पत्नीला उमेदवारी न मिळाल्याने संतप्त : राज्यातील दिग्गज नेते

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाममध्ये काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. पक्षाचे आमदार भरतचंद्र नारा यांनी सोमवारी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. नाओबोइचाचे आमदार असलेल्या नारा यांनी स्वत:चा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविला आहे. नारा हे स्वत:ची पत्नी रानी नारा यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवून देण्याच्या प्रयत्नात होते. काँग्रेस नेतृत्वाने त्यांना उमेदवारीचे आश्वासनही दिले होते. परंतु रानी नारा यांच्याऐवजी उदय शंकर हजारिका यांना उमेदवारी दिल्यावर नारा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

भरतचंद्र नारा हे काँग्रेसच्या तिकिटावर 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1985 ते 2011 पर्यंत ते सातत्याने ढकुआखाना मतदारसंघातून विजयी झाले आणि राज्यात मंत्री देखील राहिले आहेत. 2021 मध्ये त्यांनी लखीमपूर जिल्ह्यातील नाओबोइचा मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळविला होता.

रानी नारा यावेळी लखीमपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होत्या. रानी नारा यांनी या मतदारसंघात तीनवेळा विजय मिळविला होता. तसेच त्या राज्यसभा खासदार देखील होत्या. काँग्रेस नेत्या रानी नारा यांनी मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले होते.   भरतचंद्र नारा हे आसाम गण परिषद आणि काँग्रेस  या दोन्ही पक्षांच्या राज्य सरकारांमध्ये मंत्रिपद भूषविले आहे. तसेच मागील मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे माध्यम सल्लागार राहिले आहेत.

उदय हजारिका यांना उमेदवारी

काँग्रेसने यावेळी रानी नारा यांच्याऐवजी उदय शंकर हजारिका यांना लखीमपूर मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. हजारिका यांनी मागील वर्षी भाजपमधून बाहेर पडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हजारिका यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांचे पाठबळ लाभले असल्याचे मानले जाते. हजारिका यांच्यासमोर भाजप उमेदवार प्रधान बरुआ यांचे आव्हान आहे. बरुआ हे या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

Advertisement
Tags :

.