कुठल्याही परिस्थितीत आम्हीच बाजी मारणार!
डॉ. अंजली निंबाळकर यांचा कारवार लोकसभा मतदार संघात दौरा : मरगळ झटकून कामाला लागण्याचे आवाहन
कारवार : गेल्या सलग चार लोकसभा निवडणुकीत कारवार मतदारसंघावर भाजपचे असलेले वर्चस्व मोडीत काढण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला नव्हता. तथापि यावेळी मात्र काँग्रेसने डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून भाजपवर आघाडी घेतली आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसने प्रचाराच्या बाबतीत भाजपवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. निंबाळकर यांनी शिरसी, मुंदगोड, दांडेली, भटकळ, होन्नावर, कुमठा, अंकोला, कारवार, कित्तूर आदी ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन यावेळी कुठल्याही परिस्थितीत आम्हीच बाजी मारणार आहोत. त्याकरिता मरगळ झटकून कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आर. व्ही. देशपांडे, जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवारचे आमदार सतीश सैल, शिरसीचे आमदार भीमण्णा नाईक, निंबाळकर यांचा उत्साह आणि आत्मविश्वास दुणावला आहे, असे सांगितले जात आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साई गांवकर, निंबाळकर यांच्या पाठीमागून सावलीसारखे फिरत आहेत. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे सदस्य आणि कारवारच्या माजी खासदार व केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांचे पूत्र निवेदीत अल्वा काँग्रेसच्या पर्यायाने निंबाळकर यांच्या विजयासाठी आतापासूनच झटत आहेत. मार्गारेट अल्वा यांचे नेतृत्व मान्य करणारे अनेक नेते, समर्थक आणि कार्यकर्ते जिल्ह्यात अद्याप कार्यरत आहेत. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गोकर्ण, कुमठाचा दौरा करून डॉ. निंबाळकर यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे. शिवकुमार यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच कुमठाचा दौरा करून कारवार मतदारसंघातील निवडणूक गांभीर्याने घ्या, जणू असा इशाराच जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांना आणि लोकप्रतिनिधीना दिला आहे. उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर विकास आणि धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. आपल्या भागात सहा वेळा निवडून येऊनही विद्यमान खासदारांनी मतदारसंघाच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने, जिल्ह्याची आर्थिक विकासाच्या बाबतीत कशी पिछेहाट झाली आहे. याचा पाढा वाचत आहेत.