अमेरिकेत हजारो लोकांचा राष्ट्राध्यक्ष निवासाला घेराव
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात लोकांचा पुन्हा संताप : सर्व 50 राज्यांमध्ये निदर्शने
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध पुन्हा एकदा हजारो निदर्शक रस्त्यावर उतरत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सर्व 50 राज्यांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर धोरणाविरुद्ध आणि सरकारी नोकऱ्यांमधील कपातीविरुद्ध निदर्शने सुरू आहेत.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध अमेरिकेत निदर्शनांची दुसरी मोठी लाट दिसून येत आहे. यावेळी निदर्शकांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊसला वेढा घातला. लो कांनी ट्रम्प यांच्यावर सभ्यता आणि कायद्याचे राज्य चिरडल्याचा आरोप केला. या चळवळीला 50501 असे नाव देण्यात आले आहे. याचाच अर्थ ‘50 निषेध, 50 राज्ये, 1 चळवळ’ असा होतो. व्हाईट हाऊस व्यतिरिक्त निदर्शकांनी टेस्लाच्या शोरूमलाही घेराव घातला. ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शनांचा हा दुसरा टप्पा आहे. यापूर्वी 5 एप्रिल रोजी देशभरात ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने झाली होती.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांची आक्रमक धोरणे हेच राजधानी वॉशिंग्टन डीसीसह सर्व राज्यांमध्ये होणाऱ्या निदर्शनांचे प्रमुख कारण मानले जात आहे. एलॉन मस्क यांचा कार्यक्षमता विभाग सरकारी विभागांमध्ये सतत कपात करत आहे. आतापर्यंत हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. दुसरीकडे, स्थलांतरितांविरुद्ध कारवाई करण्याचे आणि इतर देशांवर शुल्क लादण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे कठोर धोरण हेदेखील या निदर्शनांचे एक प्रमुख कारण आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे इतर देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.
केवळ 45 टक्के मतदार ट्रम्प यांच्यावर खूश
अमेरिकन सर्वेक्षण एजन्सी गॅलपच्या मते, 45 टक्के अमेरिकन मतदार ट्रम्प यांच्या पहिल्या 3 महिन्यांतील कामावर समाधानी आहेत. तसेच ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान फक्त 41 टक्के मतदार ट्रम्प यांच्या पहिल्या 3 महिन्यांतील कामावर समाधानी होते. 1952 ते 2020 दरम्यानच्या सर्व राष्ट्राध्यक्षांसाठी सरासरी पहिल्या तिमाहीची मान्यता रेटिंग 60 टक्के आहे. त्या तुलनेत, ट्रम्प यांचे रेटिंग कमी असल्याचे दिसून येते. सुरुवातीला ट्रम्प यांनी पदभार स्वीकारला तेव्हा त्यांचे रेटिंग 47 टक्के होते. यामध्ये सध्या घट नोंदवण्यात आली आहे.