पाकिस्तानात इम्रान यांना 10 वर्षांची शिक्षा
शाह महमूद कुरैशींनाही शिक्षा : गुप्त पत्र चोरी प्रकरणी निर्णय
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते शाह महमूद कुरैशी यांना सायफर प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रावळपिंडी येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी शिक्षेची घोषणा केली आहे. इम्रान आणि कुरैशी यांच्या उपस्थितीतच न्यायाधीश अबुल हसनत जुल्करनैन यांनी हा निर्णय दिला आहे.
एप्रिल 2022 मध्ये इम्रान खान यांचे सरकार गडगडले होते. त्यावेळी इम्रान यांनी हे सरकार पाडविण्यासाटी अमेरिका तसेच तत्कालीन सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी कट रचल्याचा आरोप केला होता. या कटासंबंधी माहिती अमेरिकेतील त्यावेळचे पाकिस्तानचे राजदूत असद मजीद खान यांनी एका गुप्त पत्राद्वारे दिली होती असा दावा खान यांनी केला होता. राजनयिक संज्ञेनुसार अशाप्रकारच्या पत्राला सायफर म्हटले जाते.
हे सायफर अमेरिकन विदेश विभागाकडून पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाला पाठविण्यात आले होते. इम्रान यांनी पत्र 2022 मध्ये अनेक जाहीर सभांमध्ये दाखविले होते. अमेरिकेच्या इशाऱ्यानुसार पाकिस्तानी सैन्याने आमचे सरकार पाडविल्याचा दावा इम्रान यांनी केला होता. कायदेशीर स्वऊपात अशाप्रकारचे पत्र हे राष्ट्रीय गुपित असते, जे सार्वजनिक ठिकाणी दाखविले जाऊ शकत नाही.
याचबरोबर खान यांची एक ध्वनिफित व्हायरल झाली होती, यात इम्रान, तत्कालीन विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी आणि मुख्य सचिव आझम खान यांचे संभाषण होते. यात आम्ही आता हे सायफर जाहीरसभांमध्ये दाखवू असे खान यांनी कुरैशी तसेच आझम यांना उद्देशून म्हटल्याचे ध्वनिफितीत ऐकू येते.
नजराण्यांप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा
इम्रान यांना 5 ऑगस्ट 2023 रोजी नजराण्यांप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच इस्लामाबाद सत्र न्यायालयाने इम्रान यांच्यावर निवडणूक लढण्यास 5 वर्षांची बंदी घातली होती. यानंतर लाहोर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. याचबरोबर खान यांच्याविरोधात 15 गुन्हे नोंद आहेत. यात 9 मे 2022 रोजी सैन्याच्या इमारतींवर हल्ल्याचे प्रकरण सामील आहे. याप्रकरणी सैन्य न्यायालयात सुनावणी होणार आहे.