इम्रान खान यांची बहिणीने घेतली भेट
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान सुखरुप असल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
पाकिस्तानात दीर्घकाळापासून सुरू असलेली उलटसुलट चर्चा तसेच कयासांदरम्यान पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे (पीटीआय) संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची त्यांची बहीण डॉ. उजमा खान यांनी भेट घेतली आहे. ही भेट रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात झाली असून तेथे इम्रान खान यांना ऑगस्ट 2023 पासून कैद ठेवण्यात आले आहे.
मागील सुमारे एक महिन्यापासून इम्रान खान यांची भेट घेण्याची अनुमती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली नव्हती. यामुळे त्यांच्या आरोग्यावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याचाही दावा काही जणांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पाकिस्तानच्या रस्त्यांवर इम्रान समर्थकांनी जोरदार गोंधळ घातला. यानंतर माजी पंतप्रधानांच्या बहिणीला त्यांची भेट घेण्याची अनुमती मिळाली होती.
इम्रान खान सुरक्षित असून त्यांची प्रकृती बरी आहे. इम्रान यांना कोठडीत एकटेच ठेवण्यात आले असून मानसिक स्वरुपात छळ करण्यात येत आहे. इम्रान खान हे संतप्त असून जे काही घडतेय, त्याकरता आसिम मुनीर जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे, असे भेटीनंतर डॉ. उजमा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
तुरुंगाबाहेर मोठा बंदोबस्त
या भेटीदरम्यान पाकिस्तानातील पंजाब सरकारने रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला होता. 8 पोलीस स्थानकांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी तुरुंगाबाहेर तैनात राहिले. 8 किलोमीटरचे क्षेत्रात प्रवेश पूर्णपणे रोखण्यात आला होता. तसेच शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. तसेच रहिवाशांना ओळखपत्र दाखवूनच क्षेत्रात प्रवेश करण्याची अनुमती देण्यात आली होती.