इम्रान खान यांच्या अडचणी कायम
पत्नीच्या विरोधात अटक वॉरंट जारी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने इम्रान खान, त्यांच्या पत्नी बुशरा बीबी, खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि अन्य 93 जणांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. इस्लामाबादमध्ये मागील आठवड्यात झालेल्या निदर्शनांशी संबंधित एका प्रकरणी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
निदर्शनांदरम्यान हिंसा, दंगल आणि अन्य गुन्ह्यांच्या आरोपाकरता हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2023 पासून तुरुंगात कैद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 24 नोव्हेंबर रोजी देशव्यापी निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. इम्रान खान यांच्या पक्षाने अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची मुक्तता आणि 26 वी घटनादुरुस्ती मागे घेण्याची मागणी केली होती. निदर्शनांमध्ये पक्षाचे 12 समर्थक मृत्युमुखी पडले असून शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.