इम्रान खान सुरक्षित असल्याचे वक्तव्य
निदर्शकांच्या मागणीनंतर कारागृहाकडून माहिती
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी नेते इम्रानखान सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण, त्यांना ठेवलेल्या कारागृहाने एका वक्तव्याद्वारे दिले आहे. कारागृहात त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त मंगळवारी अफगाणिस्तानमधील एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. इम्रानखान यांना पाकिस्तानातील अडियाला कारागृहात डांबण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूचे वृत्त पसरताच या कारागृहाभोवती त्यांच्या समर्थकांची एकच गर्दी उसळली होती. यावेळी हिंसाचारही घडला होता.
इम्रानखान यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी पाकिस्तान सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली होती. पाकिस्तानने त्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताचा बुधवारीच इन्कार केला होता. गुरुवारी या संबंधीचे सविस्तर स्पष्टीकरण अडियाला कारागृहाने प्रसिद्ध केले आहे. इम्रानखान हे अडियाला कारागृहातच आहे. त्यांना येथून कोठेही अन्यत्र हलविण्यात आलेले नाही. त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते पूर्णत: सुरक्षित आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कुटुंबियांचा आरोप
इम्रानखान यांना 2022 मध्ये सत्तेच्या बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर विविध प्रकरणांसंदर्भात त्यांच्या विरोधात अभियोग सादर करण्यात आले. काही प्रकरणांमध्ये त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्याने त्यांना अडियाला येथील कारागृहात डांबण्यात आले. त्यांना आता एकांतवास कोठडीत ठेवण्यात आले असून कोणालाही त्यांना भेटू दिले जात नाही. त्यांना खाणेपिणेही चांगले दिले जात नाही. त्यांना व्यायाम करु दिला जात नाही. त्यांची प्रकृती कशी आहे, याची कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्या योगक्षेमाविषयी आम्हाला चिंता वाटत आहे, असे प्रतिपादन इम्रानखान यांच्या तीन बहिणींनी बुधवारी केले होते.
कारागृहाबाहेर निदर्शने
इम्रानखान यांच्या मृत्यूच्या वृत्तामुळे आणि पाकिस्तान सरकारने त्यावर त्वरित स्पष्टीकरण न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. हजारो समर्थकांनी कारागृहाबाहेर जमून गुरुवारी निदर्शने केली. काही प्रमाणात दगडफेक आणि हिंसाचारही झाला. पाकिस्तान सरकारने त्वरित त्यांच्या प्रकृतीविषयी खुलासा प्रसिद्ध करावा. त्यांना कोणत्याही अन्य कारागृहात नेण्यात येऊ नये, अशा मागण्या निदर्शकांकडून करण्यात आल्या. इम्रानखानच्या तीन बहिणी आणि त्यांचे मुलगे यांनी कारागृहाबाहेर ठिय्या आंदोलनही गुरुवारी केले होते. त्यामुळे पाकिस्तान सरकारवर दबाव वाढल्याने त्याला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
पाकिस्तान मंत्र्याचे वक्तव्य
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनीही पाकिस्तान सरकारच्या वतीने स्पष्टीकरण दिले आहे. इम्रानखान यांना कारागृहात चांगली वागणूक देण्यात येत आहे. त्यांच्या पुष्कळसे स्वातंत्र्यही देण्यात येत आहे, जे यापूर्वी कधीही त्यांना मिळाले नव्हते. त्यांच्यासाठी टीव्हीची सोय करुन देण्यात आली आहे. तसेच त्यांना व्यायामाची साधनेही उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यांना उत्तम प्रकारचे अन्न देण्यात येत आहे, असा दावाही ख्वाजा असीफ यांनी केला आहे.