जीबीएस रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा
पुढील तीन दिवसात एकास डिस्चार्ज शक्य
कोल्हापूर
मागील आठवड्यात एका वृद्धासह तीन बालकांना गुलेइन बॅरे सिंड्रोम (जीबीएसची) लागण झाल्याने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात (सीपीआर) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चौघांच्याही प्रकृतीत सुधारण होत असुन येत्या दोन ते तीन दिवसात यातील वृद्ध रूग्णाला डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. बुद्धीराज पाटील यांनी सांगितले.
मागील आठवड्यात तीन बालकांना जीबीएसची लागण झाल्याचे समोर आले. प्रारभी परराज्यातील एक वृद्ध व हातकणंगले तालुक्यातील एक 11 वर्षाची मुलगीला जीबेएसची लागण झाल्याने सीपीआरमध्ये दाखल केले होते. यांनतर गुरूवार दि.30 जानेवारी रोजी करवीर तालुक्यातील वसगडे गावातील 10 वर्षाच्या बालकाला लागण झाली. त्यापाठोपाठ 31 रोजी निपाणी तालुक्यातील 11 वर्षाच्या मुलाला दाखल केले होते.
यापार्श्वभुमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सीपीआरला अचानक भेट देवून जीबेएस रूग्णांची पाहणी केली होती. येथील विभागातील रूग्णांवर उपचारामध्ये हयगय नको, अशा सक्त सुचनाही डॉक्टरांना दिल्या होत्या. सीपीआरमधील जीबीएस रूग्णांवर उपचार सुरू असुन प्रकृतीत सुधारणा होत आहे. जीबीएसच्या रूग्णांसाठी 70 बेडचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी तज्ञ डॉक्टरांची टिम कार्यरत असुन सर्वच आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे अधिष्ठाता डॉ. एस. मोरे यांनी सागितले.