ऑक्टोबरमध्ये उत्पादन निर्देशांकामध्ये सुधारणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या उत्पादन क्षेत्रामध्ये मागच्या महिन्यामध्ये चांगली प्रगती पहायला मिळाली. मागच्या महिन्यात उत्पादन निर्देशांक (पीएमआय) 57.5 च्या स्तरावर पोहोचला होता.
सोमवारी या संदर्भातील माहिती एचएसबीसी इंडिया यांच्यामार्फत देण्यात आली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये उत्पादन निर्देशांक आठ महिन्यांच्या नीचांकावरती 56.5च्या स्तरावर कार्यरत होता. 50 पेक्षा अधिक स्तर गाठणे म्हणजे उत्पादनातील हालचालींमध्ये वेग आला असे म्हटले जाते. 50 पेक्षा कमी पातळी गाठली तर उत्पादन प्रक्रिया मंदावल्याचे चिन्ह समजले जाते.
एचएसबीसीचे मुख्य अर्थतज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले, ऑक्टोबरमध्ये भारताचा उत्पादन निर्देशांक चांगल्या वृद्धीसह कार्यरत राहिला. अर्थव्यवस्थेमध्ये झालेली सुधारणा याला कारणीभूत ठरली आहे. वेगाने वाढणाऱ्या नव्या ऑर्डर त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय विक्रीच्या बाबतीत झालेली प्रगती उत्पादन वृद्धीसाठी कारणीभूत ठरली आहे. भारतीय उत्पादनाच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ दिसून आली आहे. त्यामुळेच उत्पादन निर्देशांकाला उत्स्फूर्त कामगिरी करता आली आहे. सिप्टेंबरमध्ये निर्देशांकाची कमकुवत कामगिरी दिसली तरी त्यानंतर ऑर्डरची संख्या वाढल्याने ऑक्टोबरमध्ये हा निर्देशांक प्रगतीपथावर राहिलेला दिसला.