भारत-मालदीव संबंधांमध्ये सुधारणा
मालदीवच्या विदेश मंत्र्यांचे वक्तव्य : दोन्ही देशांमधील गैरसमज झाले दूर
वृत्तसंस्था/ माले
मालदीवचे विदेशमंत्री मूसा जमीर यांनी भारतासोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यात आले आहेत. मालदीवमध्ये अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची सत्ता आल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध काही प्रमाणात बिघडले होते असे मूसा यांनी मान्य केले आहे.
मुइज्जू यांनी मालदीवमधील भारतीय सैनिकांना हटविण्याची मागणी केल्यावर द्विपक्षीय संबंध चांगले राहिले नव्हते असे मूसा यांनी म्हटले आहे. दक्षिण आशियात स्वत:चे सहकारी देश विशेषकरून भारत आणि चीनसोबतचे संबंध आम्ही मजबूत करणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.
मुइज्जू यांच्या निर्णयामुळे तणाव
नोव्हेंबर 2023 मध्ये मुइज्जू हे मालदीवमध्ये सत्तेवर आल्यावर दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला होता. मुइज्जू यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वीच मालदीवमधील भारतीय सैनिकांना हटविण्याची मागणी लावून धरली होती. 45 वर्षीय मुइज्जू यांनी निवडणुकीत भारत समर्थक मोहम्मद सोलिह यांना पराभूत केले होते. भारताने स्वत:च्या सैनिकांना माघारी न बोलाविल्यास तो मालदीवच्या जनतेच्या लोकशाहीवादी स्वातंत्र्याचा अपमान ठरेल असे मुइज्जू यांनी म्हटले होते. मुइज्जू यांनी स्वत:च्या पहिल्या विदेश दौऱ्यासाठी चीनची निवड केली होती. तर त्यापूर्वी मालदीवच्या प्रत्येक अध्यक्षाने पहिल्या विदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली होती.
लवकरच भारत दौऱ्यावर
चीन समर्थक मुइज्जू हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी मुइज्जू हे 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात भाग घेण्यासाठी भारतात आले होते. भारताने मालदीवला आर्थिक मदतीचा प्रस्ताव दिला आहे. मालदीव सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. या आर्थिक संकटामुळेच मुइज्जू यांनी आता भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न चालविला आहे.