For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्य इस्रायलमध्ये कोसळले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र

06:05 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्य इस्रायलमध्ये कोसळले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
Advertisement

हुती बंडखोरांनी 2600 किमी अंतरावरून डागले : नेतान्याहू यांचा संरक्षणमंत्र्यांना इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलवर पहिल्यांदाच बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्याला इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा आयर्न डोम देखील रोखू शकलेली नाही. क्षेपणास्त्र एका मोकळ्या मैदानात कोसळल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. इस्रायली डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) हुती बंडखोरांकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची पुष्टी दिली आहे.

Advertisement

क्षेपणास्त्र कदाचित आकाशातच नष्ट झाले असावे आणि याचे तुकडे शेतांमध्ये तसेच रेल्वेस्थानकानजीक कोसळल्याचे आयडीएफने म्हटले आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यावेळी तेल अवीव आणि पूर्ण मध्य इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले होते, ज्यानंतर हजारो लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला होता.

7 ऑक्टोबरपूर्वी अनेक हल्ले होणार

हुती बंडखोरांचा प्रवक्ता याह्या सारीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 2600 किलोमीटर अंतरावरून हायपरसोनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे जफामध्ये एका सैन्यतळावर लक्ष्य करत हल्ला करण्यात आला होता असे सारीने सांगितले आहे. जफा हा तेल अवीवचा हिस्सा आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हल्ल्याला वर्ष पूर्ण होण्यापूर्वी अशाप्रकारचे अनेक हल्ले केले जाणार असल्याची धमकी सारीने दिली आहे.

किंमत मोजावी लागणार

या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी आम्हाला नुकसान पोहोचविण्याच्या कुठल्याही प्रयत्नासाठी हुतींना मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे. हुतींना होदेदा पोर्ट हल्ल्याची आठवण करून देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जुलै महिन्यात हुती बंडखोरांनी इस्रायलवर ड्रोनद्वारे हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत येमेनच्या होदेदा बंदरानजकी हवाई हल्ले केले होते, ज्यात हुती बंडखोरांना मोठे नुकसान पोहोचले होते.

आयर्न डोमसंबंधी होणार चौकशी

हुती बंडखोरांच्या क्षेपणास्त्राला इस्रायलचे आयर्न डोम का रोखू शकला नाही याची चौकशी सध्या सुरू आहे. हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर करत क्षेपणास्त्राला आकाशातच नष्ट करण्याचा प्रयत्न अनेकदा केला होता असे इस्रायलच्या सैन्याने सांगितले आहे. हुती बंडखोरांनी गाझामध्ये कारवाई सुरू झाल्यापासून इस्रायलच्या दिशेने ड्रोनस आणि क्षेपणास्त्रs डागली आहेत. परंतु यातील सर्वांना लाल सागराच्या वरच नष्ट करण्यात आले होते.

योव गॅलेंट यांना हटविण्याचा इशारा

पंतप्रधान नेतान्याहू यांनी संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांना पदावरून हटविण्याचा इशारा दिला आहे. नेतान्याहू हे लेबनॉनवर हल्ला करण्यासाठी आग्रही आहेत. तर  गॅलेंट यांचा याला विरोध आहे. लेबनॉनवर हल्ला करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. ओलिसांच्या मुक्ततेसाठी आणखी एक प्रयत्न केला जावा असे गॅलेंट यांचे मानणे आहे. तर गॅलेंट यांनी कुठलीही मोहीम रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पदावरून हटविण्यात येईल अशी भूमिका पंतप्रधांनी घेतल्याचे एका सहकाऱ्याने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.