शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मातीची पत सुधारून घ्या
ऊस शास्त्रज्ञ डॉ. आबासाहेब साळुंखे यांचे मार्गदर्शन : कडोलीत शेतकरी मेळावा : शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती
वार्ताहर/कडोली
शेतातील मातीची पत दिवसेंदिवस खालावत चालली असून यामुळे शेतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मातीची पत सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी ऊस शास्त्रज्ञ डॉ. आबासाहेब साळुंखे यांनी केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी लक्ष्मण गंगाराम डोंगरे होते. माजी पंतप्रधान कै. चौधरी चरणसिंग यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय किसान दिनानिमित्त कडोली येथे यशोधन कार्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात डॉ. आबासाहेब साळुंखे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ते म्हणाले, वाढता रासायनिक खतांचा वापर, तणनाशक औषधांची फवारणी, मातीसाठी घातक ठरत आहे. मातीची पत घसरली आहे.
खताचा कितीही वापर केला तरी उत्पन्न वाढणार नाही. शेतकऱ्यांनी या भ्रमात राहू नये. शेतकऱ्यांनी आता जैविक खतांचा आणि शेणखताचा वापर करावा, आणि मातीची पत सुधारुन घ्यावी. ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. मातीत आवश्यक घटक निर्माण केले पाहिजे तर पीकवाढीला आणि उत्पन्नाला वाव मिळणार आहे. यावेळी साळुंखे यांनी उसाचे उत्पन्न घेण्यासाठी आधुनिक शेतीविषयीही माहिती सांगितली. शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमात प्रारंभी ग्रा. पं. उपाध्यक्षा दीपा मरगाळे यांच्या हस्ते चौधरी चरणसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर निवृत्त मुख्याध्यापक बाबुराव गौंडाडकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बेळगाव येथील इफ्को लिमिडेटचे फिल्ड ऑफीसर नवीन पाटील, ओलम शुगर प्रा. लि.चे शेती अधिकारी नामदेव पाटील, महाधन अॅग्रीटेक लि. मार्केटिंग मॅनेजर गुरुसिद्धलिंग चिरडे, ओपल अॅग्रो केमिकल्सचे जयसिंगपूरचे मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह शेखर हेरेकर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर ओ. के. चौगुले, ग्रा.पं. सदस्या रेखा पवार, भारती चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरीधर गौडाडकर यांनी तर आभार प्रदर्शन ग्रा. पं. सदस्य राजू मायाण्णा यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी कडोलीतील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.